
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज नेटवर्क)


करमाळा तालुक्यात ज्यांना माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा तीन हजार कोटींचा विकास दिसत नव्हता, तो आता त्यांना दिसायला लागलेला आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकी नंतरच्या पहिल्या अधिवेशनात करमाळा तालुक्यासाठी विद्यमान आमदारांना दमडीही आणता आलेला नाही हे वास्तव आहे. त्यानंतर झालेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पाटील गटाला मिळालेल्या सत्तेमुळे पाटील गटावर तालुक्यातील जनतेची विकासकामे आणि आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालविणे अशी दुहेरी जबाबदारी पडलेली आहे. या जबाबदाऱ्या पुर्ण करण्याऐवजी फक्त बेताल वक्तव्ये करून जनतेची दिशाभुल करण्यापेक्षा तालुक्यात होणारी विकासकामे व आदिनाथ कारखाना चालू करण्याविषयी त्यांनी बोलावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांना लगावला आहे.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला समान न्याय हक्काने पाणी मिळाले पाहिजे. हेडच्या शेतकऱ्याप्रमाणेच टेल पर्यंतच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी मिळाले पाहीजे. या व्यतिरिक्त बंद नलिकेच्या कामाचा नाहकपणे विपर्यास करून विरोध करणे, पाईप जाळणे, कंत्राटदारांना दमदाटी करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करणे या प्रकाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व समविचारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन देऊन आज आंदोलन केले होते. आज सर्वत्र लग्नसराई असल्यामुळे भागातील अनेक लोक व्यस्त होते तरी देखिल हे आंदोलन यशस्वी झाल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.



