कुकडीच्या विसर्गासोबत पावसाची साथ; मांगी प्रकल्प १०० टक्के क्षमतेने तुडुंब!
प्रतिनिधी | अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्प लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक व आनंदाची बातमी आहे. वांगी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी मानला जाणारा मांगी तलाव अखेर शंभर टक्के भरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसाबरोबरच कुकडी प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गामुळे तलावाची पाणीपातळी वाढत गेली आणि अखेर तो पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यामधून अनियंत्रित पाणी वाहू लागले आहे.
तलाव भरल्यामुळे परिसरातील शेतकरी मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीसाठी सिंचनाची गरज पूर्ण झाली आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. समाधानकारक पावसामुळे भविष्यातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर मोठा दिलासा मिळाला आहे.
♦ मांगी मध्यम प्रकल्प वरील ‘या’ गावांना फायदा
मांगी, हिवरवाडी, भोसे, वडगाव दक्षिण, रावगाव, पुनवर, वडगाव उत्तर, जातेगाव या गावांतील ३११७ हेक्टर क्षेत्र उचल पाण्याद्वारे ओलिताखाली येते.
♦ मांगी तलावाखालील ‘या’ गावांना फायदा
मांगी मध्यम प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याद्वारे पोथरे, बिटरगाव श्री, खांबेवाडी, धायखिंडी, निलज, करंजे, भालेवाडी या गावातील २५२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असून या गावांना रब्बी व उन्हाळी आवर्तन सोडले जाते.
गेल्या २० वर्षात मांगी मध्यम प्रकल्प ७ वेळा १०० टक्के भरले
उपलब्ध माहितीनुसार २००५ नंतर मांगी तलाव हा सण २००६, २००८, २०१०, २०२०, २०२३, २०२४ व २०२५ या वर्षी म्हणजेच गेल्या वीस वर्षात सात वेळा १०० % भरला आहे.
मांगी मध्यम प्रकल्पात एकूण ३०.७२ द.ल.घ.मी. पाणी साठवण क्षमता असून सध्या तो १०० टक्के भरलेला आहे. हा तलाव द्वारविरहित असल्याने वाढत्या पावसामुळे व धरणातील येवामुळे सांडव्यावरून सतत अनियंत्रित विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नाल्यांच्या काठच्या गावांनी खबरदारी घ्यावी, ओढे-नाल्यांच्या जवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– स. कुं. पवार,
कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग सोलापूर.



