माय मराठी न्यूज नेटवर्क


दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन तरुण कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खटाव तालुक्यातील जाखणगाव शेजारील पोवई शिवारात दुचाकी आणि चार चाकी यांच्यात धडक झाली. या अपघातात तीन जण जखमी झाले होते त्यापैकी दोन कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात कीर्तनकार कुणाल शंकर जाधव आणि अभिजीत मधुकर येले यांचा मृत्यू झाला असून बाबा निवृत्ती जगदाळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की भोसरे ता. खटाव येथील कीर्तनकार कुणाल शंकर जाधव (वय २३) हे शनिवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीवरून सहकारी कीर्तनकार अभिजीत येलगे ( वय ३६ रा. देवाची आळंदी) आणि बाबा निवृत्ती जगदाळे (रा. बोथे ता. माण) यांना घेऊन पुसेगावच्या दिशेने निघाले होते. औंध-पुसेगाव मार्गावरील पोवई माळ परिसरात त्यांची दुचाकी आले असता त्या ठिकाणी टाटा सफारी (MH 12 JN 2500) या कारने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले.
या अपघातानंतर कीर्तनकार कुणाल जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर अभिजीत येलगे व जखमी बाबा निवृत्ती जगदाळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता येलगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात कारचालक जीवन पांडुरंग जाधव (रा. गादेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.




