प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोचवण्याचे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून याच्या माध्यमातून शासनाच्या सर्व आरोग्य संदर्भातील योजना जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत असे मत तहसीलदार समीर माने यांनी व्यक्त केले. शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्यावतीने करमाळा शहरात दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी करून मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप, मोफत ईसीजी तपासणी शिवाय आवश्यक असलेल्या सर्जरीची मोफत सोय करून देण्याची जबाबदारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पार पाडल्या जात आहे. आजच्या या शिबिराचे उद्घाटन समीर माने यांच्या हस्ते झाले. यानंतर बोलताना समीर माने म्हणाले की, डोळे तपासून चष्मा घेण्यासाठी एका रुग्णाला किमान एक हजार रुपये खर्च येतो पण आज या ठिकाणी मोफत चष्मे वाटप होत आहे. शिवाय सर्व प्रकारच्या आजारावर औषधे सुद्धा मोफत दिली जात आहेत. हृदय शस्त्रक्रियाची ज्यांना आवश्यकता असेल त्यांना शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याची सुविधा सोय या शिबिरात करून देण्यात आली आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून हे उपक्रम ग्रामीण भागात, गावागावात राबवले पाहिजेत. असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पक्षप्रमुख मंगेश चिवटे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गेली तीन वर्षापासून सुरू आहे. या माध्यमातून आत्तापर्यंत महाराष्ट्रात जवळपास दोन लाख रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहे. शिवाय अत्याधुनिक १४० रुग्णवाहिका महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शिवाय गरजू रुग्णांना महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी शिवसेना वैद्यकी मदत कक्षाच्या माध्यमातून मदत केली जाते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे विशाल गायकवाड, शिवसेना नेते पै. राहुल कानगुडे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपक पाटणे, शिवसेना सोशल मीडियाचे करमाळा प्रमुख निलेश राठोड, महिला आघाडीच्या प्रियंका ताई गायकवाड, तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, काँग्रेस आय चे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बापू सावंत, अर्बन बँकेचे माजी संचालक फारूक जमादार, प्रमोद भाग्यवंत, जयवंतराव जगताप युवा मंच अध्यक्ष जयराज उर्फ सोनू चिवटे, शिवसेनेचे अनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आज पहिल्या दिवशी ३४० रुग्णांनी नोंदणी केली असून उद्या मंगळवारी किमान १००० रुग्ण तपासणी करून मोफत चष्म्याचा लाभ घेतील. असा विश्वास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा शाखेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मंगळवार दि. १९ एप्रिल रोजी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उद्या दुपारी तीन वाजता करमाळा येथे या शिबिराच्या समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.




