
प्रतिनिधी/अकलुज (माय मराठी न्यूज)


शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने ‘रयतेचा राजा; राजा शिवछत्रपती’ हे सुमारे अडीच हजार कलाकारांचा समावेश असलेले महानाट्य १ व २ डिसेंबर २०२४ रोजी विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलवर सादर होणार असल्याची माहिती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
सहकारमहर्षी श़ंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, प्रताप क्रिडा मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळ अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानाट्याची निर्मिती करण्यात आली आहे.
या महानाट्याचे प्रयोग या आधीही अकलूजमध्ये झाले आहेत. तेच महानाट्य पुन्हा एकदा अकलूज पंचक्रोशी व सोलापूर जिल्ह्यातील शिवप्रेमींना पाहण्याची पर्वणी या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. यातील ९९ टक्के कलाकार हे स्थानिक असून विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुलवर दोन दिवस होणाऱ्या प्रत्येक प्रयोगास सुमारे पन्नास हजारां पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित राहतील असा अंदाज जयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला.
अकलूज मध्ये घेतलेले विविध उपक्रम…
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील हे शिवप्रेमी होते. त्यांनी १९७५-७६ मधे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सलग २ वर्षे सलग १ महिना शिव चरित्रांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. शिवराज्याभिषेक दिनी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तर स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. अकलूच्या भुईकोट किल्ल्यात तसेच शिव पार्वती मंदिरात छत्रपतींचा आश्वारूढ पुतळा, शिवकालीन किल्ल्याचा जिर्णोद्धार तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांनी पर्यटनमंत्री असताना उभारलेली शिवसृष्टी, जाणता राजा, शिवराज्याभिषेक सोहळा, रयतेचा राजा : राजा शिवछत्रपती, गड आला पण सिंह गेला, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिशय भव्य व यशस्वी आयोजन करण्यात आले होते. हे ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्ष असून सर्वात मोठा सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे जयसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.




