बारामती ॲग्रो जय श्रीराम शुगर हाळगाव साखर कारखान्यावर ऊस पीक परिसंवाद कार्यक्रम संपन्न

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)


ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र बारामती, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, बारामती ॲग्रो प्रा. लि. आणि नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कर्जत जामखेडचे आमदार मा. रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून व मा. राजेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पूर्व हंगामी ऊस लागवड आणि खोडवा व्यवस्थापन या विषयावर आयोजित केलेला ‘ऊस पीक परिसंवाद’ कार्यक्रम आज मंगळवार दि. ०९ सप्टेंबर रोजी हाळगाव येथील साखर कारखान्यावर उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी बारामती ॲग्रो चे अध्यक्ष राजेंद्रदादा पवार साहेब, उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे साहेब, प्रमुख मार्गदर्शक ऊस पिक तज्ञ तथा ॲग्रोनॉमी-नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे विभाग प्रमुख मा. डॉ. अरुण देशमुख व कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदा शास्त्र विषय विशेषज्ञ मा. डॉ. विवेक भोईटे साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. उडीद या पिकाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या जामखेड तालुक्यातील हसन शेख व अशोक भगत या शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अरुण देशमुख साहेब म्हणाले की, जमिनीची जैविक, रासायनिक आणि भौतिक सुपीकता चांगली असेल तरच शेती उत्पादनात वाढ होते. पिकाला अठरा अन्नद्रव्ये लागतात तसेच मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असले पाहिजे. ऊस या पिकाचे बेणे कमीत कमी तीन वर्षातून एकदा बदलले पाहिजे. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी व शेतीच्या शाश्वत उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी जमिनीची मशागत, बेणे निवड, लागवड पद्धत, पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग व्यवस्थापन, आंतरमशागत, हवामान बदलास अनुसरून पीक संगोपन व यांत्रिकीकरण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बारामती ॲग्रोचे वरिष्ठ ऊस विकास व्यवस्थापक प्रवीण भापकर साहेब, बारामती ॲग्रो हळगाव यु.३ चे जनरल मॅनेजर संजय घोरपडे साहेब, शेती अधिकारी मधुकर मोहिते साहेब, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे चे अधिकारी, बारामती ॲग्रो जय श्रीराम शुगर हळगाव कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी तसेच जामखेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.




