
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सोलापूर येथे शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवासेना शहरप्रमुख विशाल गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे पक्ष) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पाटील हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचे आदेश व मार्गदर्शन अनुसरून सामाजिक कार्य व राजकारणातील वाटचाल भविष्यात चालू ठेवणार आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण याप्रमाणे सेवा चालू ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी अधिक बोलताना पाटील म्हणाले की, समाजातील वंचित व अन्याय होणाऱ्या घटकांना न्याय देण्याचे काम संघटनेमार्फत करणार आहे. त्याबरोबरच प्रशासकीय स्तरावर लोककल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहोत. आम्ही फक्त राजकारण न करता सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार आहोत. आज पक्षप्रवेश निमित्त माझ्यावर जी पक्षाने सामाजिक व राजकीय जबाबदारी दिलेली आहे, त्याचा समाजोपयोगी कार्यासाठी वापर करून समाजसेवा व समाजऋण पाळण्याचा मी प्रयत्न करीन तसेच आपल्या चांगल्या सूचना व मार्गदर्शन यांचे नेहमी मी व माझे मित्र परिवार स्वागत करून त्याबाबत बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करीत राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाटील यांनी करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना संदर्भातील शेतकरी, कर्मचारी, वाहतूकदार व व्यापारी यांचे थकीत पेमेंट मिळणेसाठी वेळोवेळी निवेदने व वेळ पडताच आंदोलने केली आहेत. तसेच या सहकारी साखर कारखाना निवडणूक संदर्भात शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रस्थापिता विरोधात उमेदवार उभे करून निवडणूक लढवून चांगली मताधिक्य घेतले होते. मतदारांनी सत्ताधाऱ्यांचे विरोधात केलेले मतदान पुढील सत्ता हातातून जाण्याची लक्षणे दाखवून दिल्याने त्यांच्या कारभारात सुधारणा झाल्याचे दिसत आहे. पाटील यांनी मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधी कक्षाद्वारे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्याने अनेक रुग्णांना लाभ मिळवून दिलेला आहे. रुग्णांना मदत करताना लाभार्थी कोणत्या पक्षाचा किंवा विरुद्ध असे न पाहता त्यास मदत मिळवून दिली आहे. करमाळा शहरात बाजार दिवशी व इतर वर्दळ असणाऱ्या दिवशी ज्या अपप्रवृत्ती, हात सफाई, मोबाईल मारणे, महिलांशी गैरवर्तन व त्रास देणार्या विरोधात पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन समस्या निवारण केले आहे. तसेच कोरोणा काळात व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची ८ ते ११ मर्यादा होती ती वाढवून मिळणेसाठी सतत पाठपुरवठा केला होता. व्यापारी व ग्राहक यांची सोशल डिस्टन्स पाळून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन व्यवहार सुरळीत व सर्वांचे सामाजिक, आर्थिक व्यवस्था व्यवस्थित राहील याबाबत काळजी घेतली. वरील सर्व कार्याबरोबरच गोधन वाचवले पाहिजे त्याबाबत बेकायदेशीर गोधन कत्तलीसाठी जात असलेचे निदर्शनास आल्यास प्रशासनाला कळवून ते थांबवण्याचे काम केलेले आहे. सर्व मित्र परिवार वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गोशाळा चारा वाटप, मूकबधिर प्रशाला साहित्य वाटप अशा इतर समाज उपयोगी सुविधाबाबत नेहमी पुढाकार घेतलेला आहे.



