
करमाळा/प्रतिनिधी


लोकशाहीमध्ये समाजाला जागे करण्याचे काम हे पत्रकार करीत असून त्यांनी भयभयीत समाजाला दिशा दाखविण्यासाठी जागल्याची भुमिका घेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लेखणी चालवावी. असे मत जेष्ठ पत्रकार आय बी एन लोकमतचे माजी कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त प्रा. रामदास झोळ सर फाऊडेंशनच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. बाळशास्त्री जांभेकर जयंती दिनी करमाळा तालुक्यातील पत्रकारांचा सपत्नीक सन्मान, सत्कार सोहळा व स्नेह मेळावा करमाळा येथील राजयोग हाॅटेल येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ मॅडम, दैनिक सकाळचे माजी संपादक श्रीराम पवार, करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रशासकीय प्रमुख डाॅ. विशाल बाबर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंदार फणसे म्हणाले की, सध्याच्या युगामध्ये मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर यांच्या माध्यमातून बातमीमध्ये ब्रेकिंगची स्पर्धा चालू आहे. अशा परिस्थितीत ही समाज मनाचे भान जपत समाजाला अपेक्षित असणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधून ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवून ते प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. समाजात घडणाऱ्या बदलाबरोबर समाजात असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले तर समाजाचे पाठबळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. बदलत्या ऋतुमानाचा हवामान बदलाचा फटका आपणाला बसणार असून त्यामुळे पाण्याअभावी अन्नधान्याचे उत्पादन ही घटणार आहे. याचे थेट परिणाम आपणा सर्वांना भोगावे लागणार आहे. पाऊस पडला, नाही पडला असे म्हणून चालणार नाही तर पावसामुळे होणाऱ्या परिणामाचा विचार करून त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी कशाची गरज आहे. याची दृष्टी समाजाला, व्यवस्थेला देण्याचे काम पत्रकाराला करावे लागणार आहे.
जगाला विकासाची दिशा देणाऱ्या रोबोट पेक्षाही वेगवान असणारा मानवी मेंदू हा पत्रकाराचा असून पत्रकारांनी वर्तमान परिस्थितीनुसार भविष्याचा वेध घेत समस्याची उकल करत विकासात्मक पत्रकारिता केली तर या समाजाचे कल्याण होईल. यासाठी पत्रकाराची जबाबदारी मोलाची आहे. प्रा. रामदास झोळ सर यांनी आयोजित केलेला पत्रकार कुटुंब सन्मान सोहळा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात करमाळा तालुक्याच्या विकासाबाबत प्रा. रामदास झोळ सरांची भुमिका महत्त्वपुर्ण असुन करमाळा तालुक्याचे यशस्वी नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याने करमाळा तालुक्याचे भवितव्य उज्वल असल्याचे सांगितले.

याप्रसंगी दैनिक सकाळचे माजी संपादक श्रीराम पवार हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात पत्रकारितेमध्ये वेगवान डिजिटल मीडियाची प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डिजिटल माध्यमे समाजमन व्यापून टाकत आहेत. या माध्यमांवर लोक मते मांडतात. मात्र तुम्ही पत्रकार समाजाला विचार देता. बदलत्या काळाची पावले आपण ओळखायला हवीत. या काळाचे संक्रमणही मागे जाईल. मात्र, वर्तमानपत्र टिकून राहतील. कारण वर्तमानपत्रे विचार करायला भाग पाडतात. डिजिटल माध्यमांमुळे वृत्तपत्रांचा खप कमी झाला, असे म्हटले जाते. मात्र वृत्तपत्रे वाचणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. वस्तूनिष्ठ लेखन करणारे पत्रकार आहेत. जोपर्यंत ही वस्तूनिष्ठ पत्रकारिता टिकून राहील, तोपर्यंत लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित राहील. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे, चौथ्या स्तंभाचे, पर्यायाने लोकशाहीचे रक्षण प्राणपणाने केले पाहिजे. वास्तवतेचे भान ठेवुन, वर्तमान परिस्थीतीचा विचार करून, बातमी मागची बातमी करून व समाजाला दिशा दाखवून राजकीय व्यक्तींना अंजन घालण्याचे काम आपण केले तर समाजातील प्रश्नाची सोडवणुक होईल. यामुळे पत्रकारीता क्षेत्राचे भविष्य उज्वल होईल.

यावेळी प्रा. रामदास झोळ सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करत असून सर्वसामान्य जनता, शेतकरी, युवक व महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार आहे. करमाळा तालुका शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी येत्या काही वर्षांत आपण व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू करणार असुन युवक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नाविषयी आवाज उठवुन ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी झोळ सरांचे कार्य कौतुकास्पद असुन विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाला जनतेचे पाठबळ मिळत आहे. अशा जनसेवकाला पत्रकार बांधवाचे कायम सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, सचिव नासिर कबीर, अशोक नरसाळे, दिनेश मडके, आशपाक सय्यद, अलीम शेख, अशोक मुरूमकर, सचिन हिरडे, शितलकुमार मोटे, विशाल घोलप, सचिन जव्हेरी, संजय शिंदे, जयंत दळवी, बाळासाहेब भिसे सर, राजेश गायकवाड, सुहास घोलप, सिध्दार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, विशाल परदेशी, नागेश चेंडगे, किशोर शिंदे, तुषार जाधव, सागर गायकवाड, गिरीश पाटील, दिपक फरतडे, तात्या सरडे, अंगद भांडवलकर, दस्तगीर मुजावर, संजय मस्कर, संजय कुलकर्णी, नितीन घोडेगावकर, सुयोग झोळ, संतोष केसकर, बाळासाहेब सरडे, सचिन बिचीतकर, नानासाहेब पठाडे, उमेश पवळ, जयंत कोष्टी, राहुल रामदासी, अतुल बोकन, अंगद देवकते धर्मराज दळवी यांचा मंदार फणसे, श्रीराम पवार, प्रा. रामदास झोळ सर, माया झोळ मॅडम यांच्या हस्ते सपत्नीक शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन संगिता खाडे दराडे मॅडम यांनी तर स्वागत व आभार विक्रम दास सर यांनी मानले. प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व पत्रकारांचा यथोचित मानसन्मान व सत्कार केल्याबद्दल त्यांचे पत्रकार बांधवांच्यावतीने कौतुक होत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रा. रामदास झोळ फाऊंडेशनचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.



