महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्याच्या इशाऱ्यानंतर सहा महिन्यांपासून रखडलेले काम एक दिवसात पूर्ण

करमाळा/प्रतिनिधी


महावितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर गेले सहा महिन्यापासून रखडलेले काम एका दिवसभरात पूर्ण करण्यात आले. त्यामुळे महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्याच्या आंदोलनाचा इशारा घेणार मागे घेण्यात आला असल्याची माहिती नेरलेचे माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिली आहे.
नेरले (ता. करमाळा) येथे परांडा वरून घोटी सब स्टेशनला जाणारी मेन लाईन नेरले ते मुंगशी रस्त्याला लागून आहे. या लाईनच्या सहा महिन्यापूर्वी वीज वाहक तारा काही ठिकाणी तुटल्या होत्या. घोटी सबस्टेशनला साडेतून लाईन जोडून विज चालू होती. परंतु तुटलेल्या तारा आजपर्यंत जोडल्या नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. तसेच नेरले- गौंडरे रस्त्याजवळील राजेभोसले ट्रान्सफार्मर हा देखील दोन महिन्यापासून बंद असल्यामुळे जनावरांचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत वायरमन, कनिष्ठ अभियंता साडे, सहाय्यक अभियंता जेऊर यांना मोबाईलद्वारे व समक्ष भेटून अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ही दोन्ही कामे आज पर्यंत न केल्यामुळे दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी जेऊर येथील सहाय्यक अभियंता यांना भेटून आठ दिवसात काम पूर्ण न केल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचे आंदोलन करणेबाबतचे निवेदन औदुंबरराजे भोसले, सोसायटी संचालक सखाराम ठोंबरे, बापू ठोंबरे, बालाजी ठोंबरे, माणिक काळे, दादासाहेब ठोंबरे, आजिनाथ लोंढे, छबन लोंढे, सरपंच आबा जगताप, चेअरमन तानाजी जगताप, अमोल गवळी या कार्यकर्त्यांनी दिले होते.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, आमदार, खासदार, कार्यकारी अभियंता बार्शी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या निवेदनाचा विचार करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दि. १० नोव्हेंबर रोजी दिवसभरात दोन्ही कामे पूर्ण केली आहेत. ट्रान्सफार्मरला थोडे साहित्य कमी असल्यामुळे तो तात्पुरता सुरू केला आहे. साहित्य आल्यानंतर बाकीचे काम करण्याचे आश्वासन सहाय्यक अभियंता भोयर यांनी दिले आहे. दिवाळी अगोदर काम झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे अधिकारी कर्मचारी व पत्रकार बंधूंचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.
काम न करणारांचा समाचार आणि काम करणारांचा सत्कार हा आमचा विचार असल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहे. तसेच वेळेत काम पूर्ण झाल्यामुळे टाळे ठोकण्याच्या आंदोलनाचा दिलेला इशारा माघारी घेत आहे.
श्री. औदुंबरराजे भोसले संस्थापक, हिंदवी स्वराज्य ग्रुप



