
प्रतिनिधी/करमाळा


करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजयमामा शिंदे यांनी २०२३ वर्षाच्या प्रारंभीच संपूर्ण करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील गावे आणि वाडीवस्तीवर गाव भेट दौऱ्याचे आयोजन केलेले होते. सदर गावभेट दौरा कोर्टी गावासाठी विशेष महत्त्वाचा ठरल्याची माहिती कोर्टी चे माजी उपसरपंच सुभाष अभंग यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळी खासदारकीच्या निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून उभे राहिलेले होते. त्यावेळेस रस्त्याच्या मागणीसाठी कुस्करवाडीने निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला होता. दुरावस्था असलेल्या या रस्त्यावरून आमदार संजयमामा शिंदे कुस्करवाडीच्या भेटीसाठी आले. त्यावेळी रस्त्याची दुरावस्था पाहून त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या ३०/५४ हेड मधून या रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
कोर्टी हे गाव १२ वाडी वस्तीने मिळून बनलेले आहे. यापैकीच गोरेवाडीला भेट दिली असता तेथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था पाहून १ नवीन वर्ग खोली बांधकामासाठी ९ लाख ९८ हजार रुपयांचा निधी आमदार संजयमामा शिंदे यांनी मंजूर केला. एकूणच आमदार संजयमामा शिंदे यांचा गाव भेट दौरा कोर्टी गावासाठी फलदायी ठरला असून कुस्करवाडी आणि गोरेवाडी या वाडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न सुटण्यास मदत झालेली आहे.




