
प्रतिनिधी/करमाळा


करमाळा तालुक्यातील पोथरे गावचे सुपुत्र पै. गौतम सुरेश शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे रविवार दि. २६ मार्च रोजी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत ८० किलो वजनी गटात कुमार महाराष्ट्र केसरीचा मान मिळविला आहे.
पै. गौतम शिंदे याने कोल्हापूर येथील पै. सचिन बाबर याचा बारंदाज डावावर १०-० च्या फरकाने चितपट करून निकाली कुस्ती केली. तसेच पै. गौतम हा करमाळा तालुक्यातील भैरवनाथ शुगर, विहाळ या साखर कारखान्यांचा मानधारक पैलवान असून सध्या पुणे येथील शिवराम दादा तालीम संकुलात सराव करीत आहे.
याप्रसंगी पै. गौतम शिंदे यांचा आयोजकांच्या वतीने सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला. तसेच शिंदे यांनी मिळविलेल्या या यशाचे पोथरे परिसरातून विशेष कौतुक होत असून अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गौतम याने या पुढेही असेच यश मिळवून भविष्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करून आपल्या तालुक्यासह गावाचे नाव उज्वल करावे.
सुरेश (नाना) शिंदे,
पै. गौतमचे वडील



