
माय मराठी न्यूज नेटवर्क


अखेरच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात अखेर भारतीय संघाची सरशी झाली. नाबाद ८२ धावा करणारा विराट कोहली भारताच्या या विजयाचा खऱ्या अर्थानं नायक ठरला आहे. पाकिस्तानने या सामन्यात भारतासमोर १६० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विजयी लक्ष्य गाठून खऱ्या अर्थानं मेलबर्नमध्ये दिवाळी साजरी केली. त्याचबरोबर टी 20 वर्ल्ड कप मोहिमेची विजयी सुरुवात करताना गेल्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला.
मेलबर्नमध्ये १६० धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवातीला ४ बाद ३१ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. नसीम शाह आणि हॅरिस रौफनं भारताच्या दोन्ही सलामीवीरांना परत पाठविले. रोहित आणि राहुल प्रत्येकी ४ धावांवर माघारी परतले. त्यानंतर सूर्यकुमार यादव (१५) आणि अक्षर पटेल (२) फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. त्यानंतर विराट आणि हार्दिक पांड्याने भारतीय संघाचा डाव सावरला. इतकच नव्हे तर दोघांनी शतकी भागीदारीही साकारली. विराट आणि हार्दिकने केलेली ११३ धावांची भागीदारी भारतीय संघाच्या विजयासाठी मोलाची ठरली. विराटने ५३ चेंडूमध्ये नाबाद ८२ धावा केल्या. तर हार्दिकने ४० धावांचं योगदान दिले.
भारतीय संघाची दमदार गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी वर्ल्ड कप मोहिमेतल्या या सलामीच्या सामन्यात दमदार सुरुवात केली. युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने आपला पहिलाच वर्ल्ड कप खेळताना कमाल केली. त्याने आपल्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला शून्यावरच माघारी पाठवले आणि भारताच्या वाटेतला मोठा अडसर दूर केला. त्यानंतर त्याने भारताला आणखी एक यश मिळवून देताना रिझवानलाही ४ धावांवर बाद केलं. अर्शदीपनं आपल्या ४ षटकात ३२ धावा देताना ३ बळी मिळवले. याशिवाय हार्दिक पंड्यानं ३ तर शमी आणि भुवनेश्वरने प्रत्येकी एक बळी मिळवला. पाकिस्तानकडून शान मसूद (ना. ५२) आणि इफ्तिकार अहमदनं (५१) धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला ८ बाद १५९ धावांची मजल मारता आली.
शेवटच्या षटकातील थरार
भारतीय संघाला अखेरच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. त्यावेळी विराट आणि हार्दिक दोघेही मैदानात होते. पण मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक बाद झाला.
त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने १ धाव काढली तर तिसऱ्या चेंडूवर विराटने २ धावा काढल्या. त्यामुळे विजयाचं समीकरण ३ चेंडूमध्ये १३ धावा असं झालं. याचवेळी विराटने नो बॉलवर नवाजला षटकार ठोकला आणि सामना भारताच्या बाजूने झुकवला. पण सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट बाकी होता. कारण ३ चेंडूमध्ये ६ धावा हव्या असताना फ्रि हिटवर विराट त्रिफळाचीत झाला पण त्याच चेंडूवर भारताला बाईजच्या रुपात ३ धावा मिळाल्या. चेंडू स्टंपला लागून मागे गेला आणि त्यावर विराट आणि कार्तिकनं ३ धावा काढल्या. उरले २ चेंडू ३ धावा. त्यावेळी नवाजनं वाईड चेंडू टाकला आणि २ चेंडू २ धावा असं समीकरण बनलं.
पण पुढच्याच चेंडूवर १ चोरटी धाव घेण्याच्या नादात कार्तिक बाद झाला. पुन्हा सामन्यात ट्विस्ट आला कारण भारताला त्यावेळी हव्या होत्या १ चेंडू मध्ये २ धावा. पण नवाजनं पुन्हा एकदा वाईड चेंडू टाकला आणि त्यानंतर अश्विननं विजयी फटका मारुन भारताला सनसनाटी विजय मिळवून दिला.




