-->
करमाळासामाजिक

राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या सभासद नोंदणीला तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद

अवघ्या १५ दिवसात २०० सभासदांचा टप्पा केला पार...

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील तरुणांनी एकत्र येऊन राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड करमाळा या कंपनीची नोंदणी केलेली आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार तसेच नाबार्ड, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व वॉटर या संस्थेच्या सहकार्याने या कंपनीची स्थापना केलेली आहे.

भारत सरकारच्या १०००० शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याच्या प्रकल्पांतर्गत करमाळा तालुक्यातील स्थापन झालेली राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कं.लि. ही एकमेव कंपनी आहे. या कंपनीचे सभासद शुल्क ५१०० रुपये असून सप्टेंबर २०२२ मध्ये प्रत्यक्षात सभासद नोंदणीला प्रारंभ केला होता. कंपनी वरती विश्वास ठेवून २०० हून अधिक सभासदांनी सभासद नोंदणी केली असल्याची माहिती राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी दिली.

कंपनी विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. उत्पादक ते ग्राहक असा थेट व्यवहार झाल्यास शेतीमालाला चांगला भाव निश्‍चितच मिळू शकतो. कंपनी चा मूळ उद्देश शेतकऱ्यांचे हित जोपासणे हाच आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून अधिकाधिक उत्पादन घेणे, देश- विदेशातील बाजारपेठेला आवश्यक असलेला गुणवत्तापूर्ण माल तयार करणे, पिकांचे प्रोटोकॉल पाळणे, डाग विरहित उत्पादन घेणे, रासायनिक खतांचा अतिरिक वापर टाळून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे, मध्यस्तांची साखळी कमी करून शेतकऱ्यांना अधिकाधिक भाव मिळवून देणे हा कंपनी स्थापन करण्यापाठीमागचा मूळ उद्देश आहे. कंपनीच्या माध्यमातून गुणवत्ता पूर्ण रोपे, निविष्ठा माफक दरात उपलब्ध करून देणे, तसेच माती, पाणी परीक्षण करून रासायनिक खतांवरील अतिरिक्त खर्च कमी करणे, कृषी तज्ञांच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे, पॅक हाऊस, वेअर हाऊस, मार्केटिंग, ब्रँडिंग ची यंत्रणा उभी करणे हे कंपनीचे भविष्यातील धोरण असेल.

नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, सर्कल भाऊसाहेब, पोलीस उप निरीक्षक, शेतकरी, उद्योजक, शिक्षक, शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, इंजिनियर यांनी ज्या विश्वासाने कंपनीचे शेअर्स खरेदी केले त्यांच्या विश्वासाला बांधील राहून राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचे सर्व संचालक भविष्यात काम करतील. कंपनीचा साधा फलक ही कुठे लावलेला नसताना ५१०० रुपये शेअर्स किंमत असताना देखील केवळ सामाजिक बांधिलकीतून आणि स्वच्छ काम करण्याचा हेतू पाहून अनेक सभासदांनी आम्हाला लाभ होवो अथवा न होवो पण आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी भावना बोलून दाखवली.

सभासदांच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सर्व संचालक मंडळी करतील. ज्या नागरिकांना शेअर्स खरेदी करायचे आहेत त्यांनी संचालक मंडळाशी तात्काळ संपर्क करावा, मर्यादित शेअर्स उपलब्ध आहेत. असे आवाहन संचालक सौ अलका नलवडे, सौ रुक्मिणी माने, सौ सुपर्णा बागल,श्री अरुण चौगुले, श्री संतोष पवार, श्री बिभीषण मस्कर ,श्री जीवन होगले, श्री अजित काटूळे, श्री भारत अडसूळ यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close