
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील बोरगाव ता. करमाळा (नरुटे वस्ती) येथील प्रगतशील बागायतदार श्री. मुरलीधर विठोबा नरुटे यांच्या पत्नी व अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा तालुकाध्यक्ष मा. प्रा.ॲड. शशिकांत नरूटे यांच्या मातोश्री स्व.सौ. सुंदरबाई मुरलीधर नरुटे यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. त्यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी वाघोली येथील प्राथमिक आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थांना मोफत अक्षर उजळणी व सचित्र बालमित्र पुस्तक तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
स्वर्गीय सौ. सुंदरबाई मुरलीधर नरूटे ह्या कष्टाळू प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्या शिक्षणाच्या बाबतीत अतिशय दक्ष आणि शिक्षणप्रेमी होत्या. त्यांनी अपार मेहनत, कष्ट करून आपल्या मुलांना देखील खूप शिकवले. आपल्या दोन्ही मुली व दोन्ही मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन दिले. तसेच त्यांच्या दोन्ही सुनांना लग्नानंतर पदवीधर बनविले. आज दोन्ही सुना आरोग्य खातेत सेवा बजावत आहेत. तसेच त्यांनी आपल्या एका मुलाला उच्च शिक्षित करुन प्राध्यापक बनविले पुढे एवढ्यावरच न थांबता त्याचे कायद्याचे शिक्षण पूर्ण करुन त्यांना वकील केले.
आपल्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत असताना त्यांचे भाचे घारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री संजय सरवदे यांना त्यांनी व त्यांचे पतीने खूप मदत केली. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले म्हणून ते पुण्यासारख्या शहरात उद्योग व्यवसायात चांगल्या स्थितीत आहेत. समाजसेवेचे बाळकडू ते याच नरुटे परिवाराकडून मिळाले असल्याचे सांगतात. नरुटे परिवाराच्या ॠणातून मुक्त होण्याकामी स्व. सौ. सुंदरबाई नरुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प्राथमिक आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे भाचे श्री संजय दगडू सरवदे यांचे कडून अक्षर उजळणी पुस्तिका व सचित्र बालमित्र पुस्तक तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्राथमिक आश्रम शाळेत पुस्तक वाटप करताना शाळेतील शिक्षक वर्ग श्री. राठोड सर, श्री. गायकवाड सर, श्री. संजय सरवदे, सौ. लक्ष्मी सरवदे (ग्रा.स. घारगाव) तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



