
माय मराठी न्यूज नेटवर्क


गांधी मेडिकल, नातेपुते तालुका माळशिरस या दुकानातून मेडिसिन खरेदी केल्यानंतर रीतसर पावती ग्राहकाने मागितली. मात्र मेडिसिन ची पावती देण्यास मेडिसिन विक्रेत्याने नकार दिला. या विरोधात ग्राहकाने अन्न प्रशासन औषध विभाग सोलापूर याकडे लिखित तक्रार केल्यानंतर या तक्रारीची चौकशी होऊन गांधी मेडिकल, नातेपुते या मेडिकल दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचा लेखी आदेश अन्न प्रशासन औषधी विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव यांनी दिले आहेत.
करमाळा येथील पत्रकार नासिर कबीर हे आपल्या नातेवाईकांना घेऊन नातेपुते येथील दवाखान्यात गेले होते. त्या दवाखान्याच्या चिट्ठीनुसार गांधी मेडिकल मधून औषध घेतल्यानंतर त्या दुकानदाराला औषधाचे पक्के बिल मागितले. याचे बिल देण्यास संबंधित दुकानदारांनी नकार दिला. या प्रकाराबाबत नासिर कबीर यांनी औषधी अन्न प्रशासन विभाग सोलापूर यांच्याकडे लिखित तक्रार केली. या तक्रारीची औषध निरीक्षक स.अ. कांबळे यांनी चौकशी केली असता या चौकशीमध्ये तथ्य आढळल्यानंतर गांधी मेडिकल नातेपुते या औषध विक्रेत्याचा परवाना रद्द करण्याचा आदेश अन्न औषधी विभागाने १८ ऑगस्ट २०२२ रोजी पारित केला आहे.
औषध विक्रेते व डॉक्टर लोक संगनमताने मेडिसिन विक्रीच्या माध्यमातून रुग्णांची प्रचंड लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी येतात. ठराविक कंपनीची तिप्पट चौपट जास्त दराची औषधे रुग्णांच्या गळ्यात घातली जातात. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ९० टक्के औषध विक्रेते ग्राहकांना बिल देत नाहीत. बहुतांश डॉक्टर लोक सुद्धा औषधाचा मूळ घटक न लिहिता ज्या कंपनीशी लागेबांधे आहेत अशा कंपनीचे ब्रँड नावाने औषधे देतात. नाईलाजाने रुग्णांना अशी औषधे खरेदी करावी लागतात. अशा वेळी बिल देणे दुकानदार टाळतात. यामुळे आता या कठोर कारवाईमुळे मेडिकल विक्रेते ग्राहकांना बिल देतील का.? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य समस्या व त्यावरील उपचाराचे खर्च सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. यामध्ये आता डॉक्टरांनी सुद्धा ज्या औषधात मूळ घटक आहेत ते औषध लिहून दिले तर रुग्णांना स्वस्तात औषधी मिळतील. मात्र डॉक्टर आणि मेडिकलवाले संगनमताने जर रुग्णांना लुटण्याचे प्रयत्न करत असतील तर याबाबत आता कायदेशीर लढाई उभा करावी लागेल.
ॲड. शिरीष लोणकर प्रवक्ते, करमाळा शिवसेना
सध्या मेडिसिन विक्रेते यांच्याबाबत प्रचंड तक्रार येत असून या पुढील काळात करमाळा तालुक्यातील कुठला मेडिसिन विक्रेता ग्राहकांना अधिकृत बिल देत नसेल व मनमानी औषधे गळ्यात मारत असतील अशा मेडिकल दुकानदारा विरुद्ध लिखित तक्रारी ग्राहक पंचायतीकडे द्यावेत. ग्राहक पंचायत याबाबतीत कायदेशीर कारवाई करेल डॉक्टरांनी सुद्धा रुग्णांशी प्रामाणिक राहून कमीत कमी किमतीची व चांगल्या कंपनीची औषधे लिहून द्यावीत स्वतःला कमिशन मिळणार आहे किंवा स्वतःला फॉरेनची ट्रिप मिळणार आहे या भावनेतून अडचणीत आलेल्या रुग्णांच्या खिशातून पैसे काढत असलेल्या डॉक्टरांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. उद्यापासून ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते प्रत्येक डॉक्टर व मेडिकल दुकानदाराला भेटून रुग्णांवर दया करा अशा पद्धतीची निवेदन देणार आहेत.
ॲड. शशिकांत नरोटे अध्यक्ष, ग्राहक पंचायत करमाळा तालुका




