माय मराठी न्यूज नेटवर्क


शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधाला न जुमानता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे. याबाबतचे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही दिले आहेत.
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आणि सर्व खासदारांशी याबाबत चर्चा केली. यावेळी द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची आग्रही मागणी खासदारांनी उद्धव ठाकरेंना केली. बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असतानाही अशा विषयांवर नेत्यांची बैठक होत असत. त्यावेळीही सहकाऱ्यांची मतं जाणून घेऊन निर्णय घेतले जायचे. आताच्या परिस्थितीत ही उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत कालच्या बैठकीत चर्चा केली. द्रोपदी मुर्मू यांच्या उमेदवारीवर देखील चर्चा झाली.
मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा होत नाही- संजय राऊत
द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपला पाठिंबा होत नाही. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचाही आम्ही आदर करतो. यांच्या बद्दल आमच्या सद्भावना आहेत. अशावेळी लोकभावना पाहून निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वीही प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला होता. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नव्हता. आम्ही प्रणव मुखर्जीनाही पाठिंबा दिला होता. पक्षप्रमुख आज-उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पक्षप्रमुख कोणत्याच दबावाखाली निर्णय घेत नाहीत. आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं की, आता तुम्ही निर्णय घ्या. त्यांचा निर्णय सर्व आमदार, खासदारांना बंधनकारक असेल असे संजय राऊत म्हणाले. तसेच माझ्या नाराजी बद्दलच्या बातम्या खोट्या असल्याचेही त्यांनी सांगितले.



