
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


बोरगांव ता. करमाळा येथे शिवसाम्राज्य प्रतिष्ठान, बोरगाव ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्त शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी गावामध्ये वृक्षारोपण व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा व अभिषेक ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. विठ्ठल महाराज शेटफळकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर सुश्राव्य असे कीर्तन झाले. शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्व ग्रामस्थांना अन्नदान करण्यात आले.
यावेळी बोरगाव चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच बोरगांव पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



