माय मराठी न्यूज नेटवर्क


संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला सोमवारी वेगळीच कलाटणी मिळाली आहे. वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या केली नसून त्यांच्या जेवणातून विषारी द्रव्य देऊन त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी सोलापूरच्या दोघांना अटक करण्यात आली असून, गुप्तधनाच्या प्रकरणातून हे हत्याकांड झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अब्बास मोहम्मदअली बागवान (वय ४८ रा. मुस्लिम बाशा पेठ, सरवदे नगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवसे (वय ३० रा. वसंतविहार ध्यानेश्वरीनगर, जुना पुना नाका, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
म्हैसाळ येथे सोमवार दि. २० रोजी विष पिल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. प्रथम दर्शनी तो सामूहिक आत्महत्येचा प्रकार वाटत होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात या प्रकरणाने खळबळ उडाली होती. मृत्यू झालेल्या वनमोरे कुटुंबातील कोणीही मागे राहिले नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले होते. सावकारांच्या त्रासाला कंटाळून हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी परिसरातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून १९ जणांना अटक केली होती. पोलिसांचा अधिक तपास सुरू होता. आता आणखी दोन संशयितांना अटक करत त्या आत्महत्या नसून सर्वांचे खून करण्यात आल्याचे अधीक्षक गेडाम यांनी सांगितले.
अटक केलेले दोघेही मांत्रिकच असून त्यांनीच गुप्तधनाचे आमिष दाखवून वनमोरे कुटुंबाकडून वारंवार पैसे घेतले होते. घटनेच्या आदल्या रात्रीही संशयित म्हैसाळ येथे येऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, बागवान व सुरवसे हे दोघे नक्की कोण आणि त्यांनी नऊ जणांची हत्या का घडवली? याबाबत गेडाम यांनी तपास सुरू असल्याचे सांगत अधिक माहिती देण्याचे टाळले.
‘या’ नऊ जणांचा झाला खून
डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, आदित्य माणिक वनमोरे, आक्काताई यल्लाप्पा वनमोरे, प्रतिमा माणिक वनमोरे, शुभम पोपट वनमोरे, पोपट यल्लाप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, अर्चना पोपट वनमोरे यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्य सावकारांचा ही शोध सुरू
वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या मृत्यू नंतर केलेल्या तपासात सावकारांकडूनही त्रास देण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १९ जणांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित सहा जणांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.




