-->
करमाळाराजकियराज्य

शिवसेनेच्या भगवा सप्ताहा निमित्त करमाळा येथे ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून जे कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत आहेत त्यांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धवजी ठाकरे विराजमान झाले आहेत. अशा करमाळा तालुक्यातील जेष्ठ शिवसैनिकांचा शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने होत असलेला सत्कार कौतुकास्पद आहे. असे मत माढा लोकसभा युवा सेना विस्तारक तथा अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगरसेवक उत्तम आयवळे यांनी व्यक्त केले. यावेळी आयवळे बोलताना म्हणाले की, युवा भगवा सप्ताह हा युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. या सप्ताहास करमाळा तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

 

युवा सेनेच्या वतीने गेली आठ दिवसापासून भगवा सप्ताहाचा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात सुरू आहेत. किल्ला विभाग येथे रक्तदान शिबिर, वैद्यकीय शिबिर, वरकटने येथे वृक्षारोपण, राजुरी येथे लहान मुलांना खाऊ वाटप, नेत्र तपासणी शिबीर, किल्ले सफाई आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. सप्ताहाची सांगता करताना आज तालुक्यातील सर्व जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी पुढे अधिक बोलताना आयवळे म्हणाले की, शिवसेनेचा झंझावत घराघरात पोचवण्याचे काम ३५ वर्षापासून शिवसैनिक करत आहेत. अशा कट्टर शिवसैनिकांना वंदन करणे, त्यांना मानसन्मान देणे आणि त्यांचा सत्कार करणे हे सध्याच्या शिवसैनिकांचे आद्यकर्तव्य आहे. आजचा हा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येक खेडे गावातील, वार्डातील जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन युवा सैनिकांनी करावा असे आवाहन केले.

 

 

यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, युवा नेते राहुल कानगुडे व शहर प्रमुख विशाल गायकवाड, युवा सेना उप तालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहर व तालुक्यात शिवसेना, युवासेना फोफावत आहे. अनेक सर्वसामान्यांचे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवले जात आहेत. कोरोनाच्या काळात खर्‍या अर्थाने शिवसैनिकांनीच जनतेला मदतीचा हात दिला. आता यापुढील सर्व निवडणुका सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.

 

शिवसेनेचे करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे म्हणाले की, शिवसेना हा सर्वसामान्यांच्या मनातला पक्ष असून जाती वादाला थारा न देता सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. शिवसेनेच्या माध्यमातून मला पंचायत समितीचे सभापतीपद मिळाले हे माझे भाग्य आहे.

 

यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रियंका गायकवाड म्हणाल्या की, जुन्या शिवसैनिकांच्या कष्टाने, घामाने व वेळप्रसंगी सांडलेल्या रक्तामुळे आज महाराष्ट्रात आपले ठाकरे सरकार दिमाखात महाराष्ट्र अग्रस्थानी नेण्याचे काम करत आहे. शिवसेना म्हटलं की, शासन दरबारी अधिकारी यांची धांदल उडते कारण शिवसेना ही कधीही स्वार्थासाठी आंदोलन करणारी संघटना नसून मराठी बांधवांची व दिनदुबळ्या कष्टकरी लोकांना न्याय हक्क देणारी संघटना आहे. तसेच महिला संदर्भात आजपर्यंत केलेल्या कामाचा व पुढील काळात राबवणाऱ्या उपक्रमाचा आढावा जेष्ठ शिवसैनिकांसमोर मांडला.

 

या कार्यक्रमासाठी महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख आशाताई टोणपे, युवती सेनेच्या तालुका प्रमुख वैष्णवी साखरे, युवा नेते तुकाराम उर्फ पिल्लू इंदलकर, युवा सेना उप तालुका प्रमुख सागर कोकाटे, सोशल मीडिया तालुका प्रमुख अजय साखरे, करण काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close