
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात केंद्रिय सहकारमंत्री अमित शहा यांना शिष्टमंडळासह भेटणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आदिनाथप्रश्री विशेष लक्ष घालणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
आदिनाथ कारखाना बचाव समितीचे शिष्टमंडळ गुरुवार दि.१६ जून रोजी आ. गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार किरीट सोमय्या यांना भेटले. यावेळी बचाव समितीचे ॲड. पांडुरंग देशपांडे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, बालाजी तरंगे, पांडुरंग भोसले, शरद एकाड व शेतकरी सभासद उपस्थित होते. सोमय्या यांनी शिष्टमंडळाला एक तास वेळ देत आदिनाथ संदर्भातील सर्व माहिती जाणून घेतली.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो (रोहित पवार) यांना भाडेकराराने देवु नये. तो सहकारी तत्वावरच चालवला जावा अशी तीव्र मागणी सभासद शेतक-यांची असून, तशी ९४ टक्के सभासदांनी ठरावाला मंजूरी दिली आहे..दि महाराष्ट स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे आदिनाथवर साखर तारण कर्ज १२८ कोटी रूपये कर्ज आहे. मात्र कारखान्याकडे १०५ कोटी रूपयांची साखर शिल्लक आहे. साखरेचे १०५ कोटी रूपये वगळता केवळ २३ कोटी रूपये कर्ज कारखान्याकडे राहू शकते. असे असताना बँकेने तारण असलेली साखर जप्त करण्याऐवजी ५०० कोटीची मालमत्ता असलेला अख्खा आदिनाथ कारखानाच जप्त केला. करमाळा आणि जामखेड तालुक्यातील ३१ हजार १३७ ऊस उत्पादक सभासद असलेला, साधारण ५०० कोटीची मालमत्ता असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा मुबलक ऊस आणि उजनी धरण पाण्यामुळे समृध्द आहे.
दरम्यान, आदिनाथ कारखाना बचाव समितीचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपा प्रदेश कार्यालयात भेटले. फडणवीस यांनी शिष्टमंडळकडून आदिनाथबाबतची माहिती जाणून घेवून, शेतकरी हितासाठी आपण लक्ष घालून सर्वोतपरी मदत करणार असल्याचे सांगितले.




