मुलींनो पालकांसोबत संवाद वाढवा – ॲड. रुपालीताई ठोंबरे पाटील
बधे महिला महाविद्यालयात ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


विद्यार्थिनींनो महाविद्यालयामध्ये, समाजामध्ये वावरताना सायंकाळी घरी आल्यावर दिवसभर आपल्यासोबत जे काही बरे-वाईट घडले ते पालकांशी मोकळेपणाने बोला. आपल्याला जर भविष्यातील संकट टाळायचे असेल तर आपल्या पालकांशी संवाद वाढविलाचं पाहिजे, असे प्रतिपादन झाशीची राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. रुपालीताई ठोंबरे – पाटील यांनी केले.
श्रीमती कलावती बधे कला व वाणिज्य महिला महाविद्यालय कोंढवा बु., पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळेमधील ‘बोल सहेली खुलके बोल’ या सत्रामध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर माऊली प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. प्रितीताई संदीप बधे, सामाजिक कार्यकर्त्या पूनमताई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद धिवार, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हर्षदकुमार मुंगे उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना रुपालीताई म्हणाल्या की, स्वत:च्या क्षमता स्वत: ओळखा आणि त्या वाढविण्याची क्षमता आपल्या स्वत:मध्येच असते याची जाणीव करून घ्या आणि स्वत:ला निर्भय बनवा, असे आवाहन या प्रसंगी केले. तर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात पूनमताई पाटील यांनी मुलींना स्वत:बद्दल कसलाही न्यूनगंड न बाळगण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात ॲड. प्रितीताई संदीप बधे म्हणाल्या की, आपल्या पालकांना विरोध केला म्हणजे आपण निर्भय झालो असे नाही, तर आपल्या पालकांचा विश्वास कमावून समाजामधल्या दुष्ट प्रवृत्तींना आपल्याला वेळीच आवर घालता आला पाहिजे तरच तुम्ही खऱ्या अर्थाने निर्भय झालात असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. प्रमोद धिवार यांनी स्वत:चा आत्मविश्वास वाढवून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन विद्यार्थिनींना केले. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हर्षदकुमार मुंगे यांनी केले, सूत्रसंचालन आरती सुतार तर आभार प्रा. सुशिला भोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ज्योती अंकम, स्वरांजली भालेराव यांनी तर श्रुती अदानकर, सायली मांडगे, साक्षी गिरे, निकिता कोळपकर, शितल सक्सेना, प्रियांका रोडे या विद्यार्थी प्रतिनिधींनी सहकार्य केले.




