-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

आदिनाथ बचाव समितीची बैठक बागल यांच्या निवास्थानी संपन्न; ‘काय’ म्हणाल्या रश्मी बागल- वाचा सविस्तर

कारखाना भाडेकराराने देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेचा; रश्मी बागल यांचा दावा

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेकराराने देण्याची प्रक्रिया राज्य सहकारी बँकेने केली आहे. आम्ही वारंवार साखर विकून कर्जाचे पुनर्गठन करून द्यावे. अशी मागणी बँकेला केली होती. मात्र, बँकेने सर फेक्सी कायद्यानुसार तातडीने जप्तीची कारवाई करून कारखाना भाडे कराराने देण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी सभासद करत असतील तर तो ठराव आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मांडू असे आश्वासन आदिनाथच्या संचालिका रश्मी बागल-कोलते यांनी आदिनाथ बचाव समितीच्या सदस्यांना दिले.

 

आज बचाव समितीच्या वतीने आदिनाथ चे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, माजी संचालक डॉक्टर वसंत पुंडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, मार्केट कमिटीचे चेअरमन प्रा. शिवाजी बंडगर, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, आदिनाथचे माजी व्हाईस चेअरमन प्रा. शिवाजीराव देशमुख सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविंद्र गोडगे, सुदर्शन शेळके, बळीराजा शेतकरी संघटनेचे अण्णा सुपनर, प्राचार्य जयप्रकाश बिले आदी पदाधिकाऱ्यांनी रश्मी बागल यांना निवेदन दिले. यावेळी आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे डॉ. हरिदास केवारे यांच्या सह ११ संचालक उपस्थित होते.

 

यावेळी हरिदास डांगे म्हणाले की, आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकार तत्त्वावर चालावा अशी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड झाली आहे. कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. संचालक मंडळांनी जर आम्हाला विश्वासात घेऊन काम केले तर निश्चितच हा कारखाना सहकार तत्वावर यशस्वीपणे चालून तालुक्याचे ऊस उत्पादकांचे व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील यासाठी कारखान्यांनी तात्काळ सर्वसाधारण सभा घेऊन भाडेकरार ठराव रद्द करावा व राज्य सहकारी बँकेशी संपर्क साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. यासाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, अजित दादा पवार यांची भेट घेऊन कारखान्याला मदत करण्याविषयी विनंती करावी.

 

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले कि, जुलै २०२० मध्ये आदिनाथ कारखान्याकडे केवळ १५ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी होती. उर्वरित कर्ज नियमित होते केवळ १५ कोटी रुपयांच्या एनपीए साठी तीनशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी असलेल्या आदिनाथ कारखान्याचा लिलाव प्रक्रिया घाईघाईने करणे हा व्यवहार संशयास्पद आहे. इतर कारखान्याकडे दोनशे तीनशे कोटी रुपये थकबाकी असताना सर फॅक्टरी ॲक्ट नुसार कारवाई होत नाही. मात्र आदिनाथ वर केवळ १५ कोटी साठी जप्तीची कारवाई होते. यामध्ये काय गौडबंगाल आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. शिवाय गोडाऊन मध्ये साखर शिल्लक असताना जप्तीची कारवाई करणे सुद्धा संशयास्पद आहे. शिवाय नंतर निविदा प्रक्रियेत बदल करून पंधरा वर्षाचा करार पंचवीस वर्षाचा करणे व संपूर्ण आदिनाथ ची मालमत्ता भाडेकराराच्या नावाखाली कारखानाच हडप करण्याचा डाव करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. आज बारामती ॲग्रोशी करार केला का!! करार नाही केला!! करारा मधील नियम व अटी काय आहेत! हे सर्व गुलदस्त्यात ठेवून आदिनाथ ची दोन वर्षे वाया घालवले आहेत. यामुळे आता हा करार रद्द करावा अशी मागणी केली.

 

यावेळी देवानंद बागल यांनी आदिनाथ कारखाना वाचण्यासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे. एकमेकांवर टीका टीपणी करण्यापेक्षा इथून पुढे काय करायचे यावर आदिनाथ च्या ऊस उत्पादकांनी व कर्मचाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे आवाहन केले. कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सभासदांच्या मागणीचा आदर करून पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले.

 

आजच्या या बैठकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीत रश्मी बागल यांनी सभासद व कर्मचार्‍यांच्या भावना ऐकून लवकरच सर्वसाधारण सभा घेऊ असे आश्वासन दिल्यामुळे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या मनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रश्मी बागल यांच्या या समन्वयाच्या भूमिकेचे ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close