माय मराठी न्युज नेटवर्क


बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या स्लॅब साठी तयार केलेले लोखंडी जाळ्यांचे सात कोसळल्याची दुर्घटना येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या जाळ्याखाली अडकून सात बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच उर्वरित जखमी झालेल्या आठ कामगारांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकाच्या अलीकडे वाडिया फार्मच्या जागेवर ब्लू ग्रास कंट्रक्शन ची इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या बेसमेंटचे काम सुरू असून, तेथे भूमिगत स्लॅप टाकण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक लोखंडी छत तयार करण्याचे काम पंधरा कामगार करत होते. ते प्रामुख्याने लोखंडी गजांचे वेल्डिंग करते त्यावेळी हे वजनदार लोखंडी छत कोसळले. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच, येरवडा पोलीस ही तेथे पोहोचले होते. लोखंडी गजाखाली अडकलेल्या कामगारांची सुटका करताना अग्निशामक दलाच्या जवानांना अडचणीचा सामना करावा लागला. जवानांनी कटरच्या सहाय्याने गज कापून मदत कार्याचा मार्ग खुला केला. यातून त्यांनी बाहेर काढलेल्या कामगारांपैकी सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, रोहिदास पवार, सहाय्यक आयुक्त किशोर जाधव आदी घटनास्थळी उपस्थित होते. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांकडे सुरक्षा साधने नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल असे येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी सांगितले आहे.




