प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील पोमलवाडी ते इंदापूर तालुक्यातील चांडगाव या भीमा नदीच्या पात्रा वरील तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रीज करीता पाठपुरावा करणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस श्री. निवास दादा उगले यांनी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पोमलवाडी ते चांडगाव दरम्यान चा महत्वकांक्षी पुल भिमा नदी पात्रावर झाल्यास पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क मराठवाड्याशी होणार आहे. आमचे मित्र अॅड. अजित विघ्ने, अशोकराव पाटील यांनी करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे माध्यमातुन हा प्रश्न नियोजनबद्ध पद्धतीने मांडुन व पाठपुरावा करून मंजुरी मिळवणे बाबतची कार्यवाही चालु केलेली आहे. यासाठी मी व माझे कार्यकर्ते देखील या लोक चळवळीत सहभागी होत आहोत. हा मार्ग झाल्यास हा एक विकासाचा मार्ग होणार आहे. येथील वास्तव अॅड. अजित विघ्ने यांनी समोर आणलेले असुन या ठिकाणी भूसंपादनाची कोणतीच आवश्यकता नाही. त्यामुळे शासनाला बांधकामासाठीचा व भरावाचाच खर्च करावा लागणार आहे. हा मार्ग करमाळा तालुक्याच्याच नाही तर दोन विभागाच्या दृष्टीने महत्वपुर्ण असुन इंदापुर तालुक्यातील अतिरिक्त ऊस अंबालिका (बारडगाव, राशीन) व साईकृपा (हिरडगाव, श्रीगोंदा) या साखर कारखान्याना जाऊ शकतो.
या भागात पर्यटनाला वाव असुन हा पुल झाल्यास आम्हाला इंदापुर, बारामतीची MIDC जवळ येणार आहे. परिणामी रोजगाराच्या संधी वाढणार असुन उदयोग, दवाखाने, शैक्षणिक सुविधा व मोठ्या बाजारपेठा हाकेच्या अंतरावर येणार आहेत. या मार्गाने अकलुज, पंढरपुर हे देखील नजीक येणार आहेत. या पुलासाठी मी सर्वासोबत राहुन पाठपुरावा करणार आहे. तसेच आवश्यक ते सहकार्य करणार आहे. जेणेकरून हा मार्ग नक्कीच एक विकासाच मार्ग ठरणार आहे.




