केम प्रतिनिधी/संजय जाधव


वडशिवणे तालुका करमाळा येथील भगवंत पवार यास ONGC स्कॉलरशिप मंजूर झालेली आहे. ONGC ही भारत सरकार ची प्रमुख कंपनी असून या कंपनीमार्फत MBBS चे शिक्षण घेणाऱ्या देशभरातील १९० मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. यासाठीची पूर्ण निवड प्रक्रिया ही पारदर्शक व गुणवत्तेच्या जोरावर केली जाते. पात्र विद्यार्थ्यांस प्रतिवर्षी वैद्यकीय शिक्षण पूर्ण होईपर्यंत ४८०००/- रू. दिले जातात.
या सर्व प्रक्रियेतून भगवंत ची निवड झाल्याबद्दल भगवंतचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भगवंतने जि. प. शाळा वडशिवणे येथे प्राथमिक शिक्षण घेतले आहे. तसेच पुढे ०५ वी ते १० वी पर्यंत वडशिवणे येथीलच अजितदादा पवार विद्यालयात मराठी माध्यमातून ९५.२० % गुण मिळवून १० वी ऊत्तीर्ण झाला. त्यानंतर पुढे सोनवणे काॅलेज ऊक्कडगाव येथून ९१.२३ % गुण मिळवून १२ वी ऊत्तीर्ण होत नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ६४५ गुण मिळवून तो MBBS शिक्षणासाठी एम्स हैद्राबाद या ऊच्चनामांकित संस्थेत प्रवेशपात्र ठरला. त्याची संपूर्ण साडेचार वर्षाची हाॅस्टेलसह फि फक्त ५८५६/- रू. आहे.
मुलांकडे गुणवत्ता असेल तर सहज व कमी खर्चात MBBS होता येते. हे भगवंत ने दाखवून दिले आहे. सध्या तो द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून तो प्रथम वर्षीच्या परीक्षेत सूवर्णपदकविजेता ठरला आहे. त्याचा संपूर्ण शैक्षणिक वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले असल्याचे वडील गणेश पवार यांनी आवर्जून सांगितले. भगवंत चे वडील शेतकरी तर आई आशा वर्कर म्हणून काम करतात.




