दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार पुढे ढकलले- आ. संजयमामा शिंदे
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदायिनी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन देण्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून ते आवर्तन आज पासून म्हणजे ०२ फेब्रुवारी पासून सुरू करायचे होते. परंतु लोकांची मागणी नसल्यामुळे, तसेच आवर्तन सुरु झाल्यानंतर येणाऱ्या अडचणीमुळे आवर्तन तात्पुरते पुढे ढकलावे अशी आग्रही मागणी शेतकरीवर्ग मधून होत होती. त्यांच्या विनंतीनुसार आवर्तन तात्पुरते स्थगित केले असून शेतकऱ्यांशी चर्चा करून हे आवर्तन १० फेब्रुवारी च्या पुढे सुरू केले जाईल अशी माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दहिगाव योजनेचा मुख्य कॅनॉल २७ कि.मी. लांबीचा आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कुंभेज पंप हाऊस ओवरफ्लो होऊन त्याचे पाणी लोकांच्या ऊस पिकामधून जाते. तो ऊस तोडणी अद्याप बाकी आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये काही ठिकाणी कॅनाल पाझरतो. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा ऊस अद्याप गाळपासाठी गेलेले नाहीत. त्यामुळे सदर आवर्तन पुढे ढकलणे योग्य ठरेल असे वाटल्यामुळे आवर्तन तात्पुरते स्थगित केले आहे.
आवर्तनाची सर्व तयारी पूर्ण
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन आजपासून सुरू करण्याची सर्व तयारी जल विद्युत विभाग, यांत्रिक विभाग तसेच स्थापत्य विभागाने केलेली असून आज आवर्तन सुरू करणे नियोजीत होते. परंतु शेतकरी वर्ग मधून काही अडचणी उपस्थित केल्यामुळे आवर्तन तात्पुरते पुढे ढकलले आहे.
एस.के. अवताडे उपअभियंता, कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.१२




