-->
क्राईम

दुसऱ्या पत्नीची मुलगी झाली नकोशी; म्हणून १० वर्षाच्या लेकीला बाप देत होता फाशी.? पण…

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

 

नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी जंगलात शुक्रवार दिनांक ०७ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास माणुसकीला काळिमा फासणारी अतिशय भयंकर घटना घडली. एका मुलीची सावत्र आई घर सोडून गेल्याने जन्मदात्या बापानेच लहानग्या मुलीला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एका गुराख्याच्या प्रसंगावधानाने त्या मुलीचा जीव वाचला. त्यानंतर पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवत मुलीच्या बापालाच अटक केली आहे. राम महादू धनगरे (रा. मुंगसरा, ता.जि. नाशिक), असे त्या संशयित बापाचे नाव आहे.

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देहरेवाडी परिसरातील अनेक गुरे जंगलात चरण्यासाठी आणली जातात. काल ही देहरेवाडी येथील गुराखी नारायण गांगुर्डे आपली गुरे घेऊन जंगलात आले होते. मात्र, त्यांच्या कानावर कसला तरी आवाज पडला. त्यांची उत्सुकता चाळवली. त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यांना अगोदर जंगलातील हिंस्त्र प्राणी, जनावरे असतील असे वाटले. त्यामुळे त्यांची भीती वाढली होती. कारण या जंगलात नेहमीच हिंस्त्र प्राण्याचा वावर असतो. गांगुर्डे यांची अगोदरच नुसत्या कल्पनेने घाबरगुंडी उडाली होती. शेवटी त्यांनी धाडसाने आवाजाच्या दिशेने जात पाहिले, तर समोरचे दृश्य धडकी भरवणारे होते.

 

 

एक व्यक्ती एका लहान मुलीला फासावर लटकवत होता. हे पाहता गांगुर्डे यांनी जोरदार आरडाओरडा सुरू केला. आणि तितक्याच वेगाने त्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली. हे पाहून समोरच्या व्यक्तीने मुलीला फास देणारा दोर सोडून जंगलात पोबारा केला. गांगुर्डे यांनी मुलीच्या गळ्याचा फास काढला. तिला गावात आणले आणि घटनेचे माहिती पोलीस पाटील साहेब साळवे यांना दिली. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. या मुलीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. पोलिसांना रात्री उशिरा या मुलीची ओळख पटवण्यात यश आले. ही मुलगी मुंगसरा या गावातली आहे. ती सध्या चौथ्या वर्गात शिकते. मात्र, हे कृत्य कोणी आणि का केले याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली. हा नरबळीचा वगैरे तरी प्रकार नसावा ना, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली. मात्र, यातले सत्य अखेर समोर आले आहे.

 

 

मुलीला तिच्या वडिलांनीच फासावर देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने असे धक्कादायक वळण घेतल्याचे पाहून पोलीस सुद्धा हादरले आहेत. बापाला मुलगी नकोशी झाली होती. त्यामुळे त्याने तिला जंगलात नेऊन संपवायचा घाट घातला. तिला फाशी देऊन संपवण्याचा त्याचा डाव होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close