विद्युत खांब बदलण्यासाठी ग्रामपंचायतीचे महावितरणला निवेदन

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील प्रभाग क्रमांक दोन मधील धोकादायक विद्युत खांब दुसरीकडे हलविण्यासाठीचे निवेदन नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना कोरेगाव भीमा ग्रामपंचायत च्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विक्रम गव्हाणे, अर्चना सुपेकर तसेच निखिल सुपेकर, गणेश भवाळकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये असलेल्या श्री भैरवनाथ मंदिर व त्याच्या बाजूला असलेल्या जागेत दोन विद्युत खांब असुन ते जुने झाल्याने त्यातून काही वेळा विद्युत प्रवाह वाहतो. याचा येथे राहणाऱ्या नागरिकांना व खेळणाऱ्या लहान मुलांना धोका आहे. तसेच श्री भैरवनाथ मंदिरा जवळील विद्युत खांब रस्त्यातच असल्याने वाहनाची धडक याला बसून एखादा अपघात या भागात होऊ शकतो. यासाठी सरपंच अमोल शहाजी गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्य विक्रम गव्हाणे यांनी पुढाकार घेत सदर विद्युत खांब पर्यायी जागेत हलविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून विद्युत महामंडळाचे सहाय्यक अभियंता बसवराज बिराजदार यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले.
सदर विद्युत खांब दुसऱ्या जागेत हलविण्यासाठी तंत्रज्ञ पांडुरंग बगाटे व सहकार्यांना बिराजदार यांनी सूचना केली असून लवकरात लवकर त्यावर कार्यवाही होणार असल्याचे बिराजदार यांनी यावेळी सांगितले.




