प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील कामोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पालक सभा शनिवार दिनांक १८ डिसेंबर रोजी शाळेमध्ये उत्साही वातावरणात पार पडली. ही सभा कामोणे गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थित संपन्न झाली. यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. गोपाळ भांडवलकर यांची तर उपाध्यक्षपदी श्री. विठ्ठल नलवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या सभेमध्ये मुख्यतः शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन हा विषय मांडण्यात आला. यावेळी आलेल्या पालकांच्या संमतीने सर्व सदस्यांची निवड करण्यात आली. निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सर्व सदस्यांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये अध्यक्षपदी गोपाल भांडवलकर यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी विठ्ठल नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी सौ. पूजा नलवडे, सौ. मनीषा खरात, सौ. सुषमा पाटील, श्री. सोमनाथ भिसे, सौ. रेखा पवार, सौ. शैला शिंदे, श्री. ज्ञानदेव खरात, सौ. राणी भालेराव व सौ. वनिता करळे यांची पालक सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तसेच श्री. अंकुश विनायक शिंदे यांची शिक्षणतज्ञ सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व नूतन सदस्यांचा व अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षकांनी या सभेचे आयोजन करून सदर सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.



