माय मराठी न्युज नेटवर्क


मुंबईमध्ये साकिनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण अजुन ताजे असतानाच मुंबई नजीक असलेल्या भिवंडीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर तिच्या ४८ वर्षीय नराधम काकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे. भिवंडी तालुक्यातील एका गावात पीडित अपंग अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहते. त्याच गावामध्ये पीडित मुलीचा नराधम काका ही राहतो. पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र, या घटनेमुळे अपंग असलेली पीडित मुलगी मानिसकदृष्ट्या दबावाखाली असल्यामुळे घडलेल्या अत्याचाराबद्दल काही बोलली नाही. घरच्यांनी तिच्याकडे रविवारी चौकशी केली असता, अत्याचाराची घटना समोर आली.
त्यांनतर पीडितेच्या कुटुंबाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पीडित मुलीचा जबाब नोंदवला गेला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नराधम काकावर भा.दं.वि. कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनतर नराधम काकाला पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील नाईकपाडा येथून अटक केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.




