माय मराठी न्युज


बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा – मेहकर दुसरबीड या गावानजीकच्या तळेगाव फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर, तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मजूरांना घेऊन हे टिप्पर निघाले होते. दुसरबीड जवळील तळेगावमध्ये हा टिप्पर उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या टिप्परमध्ये एकुण १५ मजूर होते. टिप्पर उलटल्याने झालेल्या अपघातात १२ जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीररीत्या जखमी आहेत. पाऊस चालू असल्याने वळण मार्गावर चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आले नाही त्यामुळे हा अपघात घडला आहे.
या अपघातात जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेले मजूर हे परप्रांतीय असून मध्य प्रदेश व बिहार या राज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक व पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. हा अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती.




