अवघ्या ९ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून धक्का बसेल
इंदापूर तालुक्यातील भटनिमगाव येथील ही धक्कादायक घटना आहे
माय मराठी न्युज


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील भट निमगाव या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील एका तरुणाने क्षुल्लक कारणावरून आपल्या पत्नीची स्क्रू ड्रायव्हर च्या साहाय्याने हत्या केली. विशेष म्हणजे या दोघांचे अवघ्या नऊ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
याबाबात अधिक माहिती अशी की, हे दाम्पत्य शुक्रवारी एका नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलेले असताना या लग्नात पत्नीने हळदीच्या कार्यक्रमात आरोपी पतीला खूप जास्त हळद लावली होती. या रागातून त्याने पत्नीची हत्या केल्याचं कारण समोर आलं आहे. हत्येमागील हे कारण ऐकून सर्वानाच धक्का बसला आहे. या प्रकरणी आरोपी जानसन पोपट पवार (वय २५ वर्षे) आणि त्याचे वडील तानाजी पवार या दोघांना अटक करण्यात आलेली आहे. तर मृत महिलेचे नाव सीमा पवार (वय २०वर्षे) असून ती आपल्या पतीसह एकत्र कुटुंबात राहत होती.
या प्रकरणाबाबत इंदापूरचे पोलीस निरीक्षक मा. गोडसे यांनी सांगितले की, ते कुटुंबातील एका नातेवाईकांच्या लग्नाला आले होते. तेथील हळदी समारंभात पत्नीने आपल्या पतीला जास्त प्रमाणात हळद लावल्यामुळे या दोघांमध्ये खूप वाद सुरू झाला. रात्री जेव्हा ते दोघे झोपायला गेले तेव्हा पतीने जवळच असलेला स्क्रू-ड्रायव्हर घेऊन पत्नीवर वार केले आणि तिची हत्या केली.
अवघ्या 9 महिन्यांपूर्वीच या दोघांचे लग्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार सीमा ही जानसन यांची दुसरी पत्नी होती, तर जानसन हा सीमाचा तिसरा पती होता. ते दोघे पारधी समाजातील असल्याची माहिती असून ठिकठिकाणी मजुरीचे काम करून घर चालवित होते. या प्रकरणी सदर आरोपी विरोधात ३०२ व ३४ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




