धक्कादायक: घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
माय मराठी न्युज


मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात संततधार पावसाने थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून अनेक घरे पावसामुळे कोसळली आहेत. अशा परिस्थितीत रीवा जिल्ह्यातील बहेरा घुचीयारी या गावातही मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्री येथील रहिवासी असलेल्या मनोज पांडे यांचे घर पावसामुळे कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण दबले गेले. त्यापैकी पैकी चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी आहे.
जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा लोकांना पावसामुळे काहीही समजले नाही. परंतु, दुसऱ्या दिवशी याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पांडे कुटुंबियांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मात्र त्यातील चौघांचा अगोदरच मृत्यू झाला होता.
मृत्यु झालेल्यांची नावे केमला देवी (वय ७० वर्ष), मनोज पांडे (वय २७ वर्षे), काजल पांडे (वय ८० वर्षे) अनन्या पांडे, (वय ४ वर्षे) आहेत तर मनोज पांडे यांची मुलगी अंचल पांडे (वय ६ वर्ष) ही गंभीररित्या जखमी आहे. तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
रीवा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेतील बळीच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.



