अभिमानास्पद: जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक; तर ‘या’ दोन महिला खेळाडूंची विजयी सलामी
टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये भारतीय महिला खेळाडूंची दमदार खेळी
माय मराठी न्युज


जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने मोठे यश संपादन केले आहे. हंगरी येथे होणाऱ्या या स्पर्धेमध्ये भारताची महिला खेळाडू प्रिया मलिक हिने महिलांच्या ७५ किलो वजनी गटातील सुवर्णपदक जिंकले आहे. प्रियाने बेलारूस कुस्तीपटूचा ५-० असा पराभव करून जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. प्रियाने २०१९ साली पुण्यात खेलो इंडिया मध्ये सुवर्ण पदक, २०१९ लाच दिल्लीत १७ व्या स्कूल गेम्स मध्ये सुवर्ण पदक आणि २०२० मध्ये पटना येथे राष्ट्रीय कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. प्रिया मलिक ने २०२० मध्ये आयोजित राष्ट्रीय स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
मीराबाई चानू यांनी शनिवारीच टोकियो ऑलम्पिक २०२१ मध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. प्रिया मलिकचे हे यश देशासाठी अभिमानाची बाब आहे. प्रियाच्या या यशाचे ट्विटवर अनेक लोकांकडून अभिनंदन होत आहे.
प्रियाच्या या कामगिरीमुळे हरियाणाचे क्रीडा मंत्र्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले ‘हंगरीच्या बुडापेस्ट येथे आयोजित जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्या बद्दल महिला कुस्तीपटू प्रिया मलिक हिचे अभिनंदन”
तनुला ही यश मिळालं
भारताची आणखी एक युवा कुस्तीपटू तनु देखील विश्वविजेता झाली आहे. तनुने तिच्या सामन्यात एकही गुण न गमावता ४३ किलो वजन गटात जेतेपद जिंकले. तिने अंतिम सामन्यात बेलारूसच्या वॅलेरिया मिकीसिचचा पराभव केला.

महिला बॉक्सर मेरी कोमची विजयी सलामी
भारताची स्टार महिला बॉक्सर आणि सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरी कोमने विजयी सलामी देत टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले. रविवारी मेरी कोमने शानदार खेळी करून ५१ किलो वजनी गटातील पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धी डोमिनियन रिपब्लिकच्या खेळाडू हर्नांडेझ गार्सियाचा ४-१ ने पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

सिंधूच्या शानदार कामगिरीने विजयी सलामी
भारताची पदक आशावादी विश्वविजेती पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिक बॅडमिंटन महिला एकेरीत इस्त्राईलच्या केनिया पॉलिकार्पोवावर सरळ गेम जिंकून आपल्या विजयी मोहिमेची सुरुवात केली आहे. रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकणारी सहावी मानांकित सिंधूने तिच्या ५८ व्या क्रमांकाच्या इस्त्रायली प्रतिस्पर्ध्याविरुद्ध २८ मिनिटांत २१-०७, २१-१० असा सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे.




