पावसाचा हाहाकार: दरड कोसळल्याने ३० घरे ढिगाऱ्याखाली तर ७० जण अडकल्याची भीती
माय मराठी न्युज


मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला असतानाच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. महाड तालुक्यात दरड कोसळली असुन ३० घरे ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तसेच यामध्ये एकूण ७० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
महाड मधील बिरवाडी या गावातील ३० घरे ढिगाऱ्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या परिसरातील अनेक नागरिक बेपत्ता झाल्याची शंका असून पोलिस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहेत.

कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू असल्याने अनेक दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणी पूल कोसळले आहेत, तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत, तर काही ठिकाणी संपूर्ण गावं पाण्याखाली गेल्याच्या ही घटना घडल्या आहेत. त्यातच आता महाडमध्ये तब्बल ३० घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाडमधील दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाकडून मदतकार्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र पुराच्या पाण्यामुळे घटनास्थळी मदत करण्यास अनेक अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.




