-->
करमाळा

संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन; रावगावात भक्तीचा महासागर, प्रशासनाची जय्यत तयारी

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

महाराष्ट्रातील मानाच्या दहा दिंड्यांपैकी एक असलेल्या तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याचे शनिवार, दि. १८ जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्याची सीमा ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रावगाव येथे भक्तिमय वातावरणात आगमन होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन, करमाळा तालुका प्रशासन, रावगाव ग्रामपंचायत तसेच हजारो वारकरी आणि भाविक सज्ज झाले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीचे स्वागत हलग्यांच्या कडकडाटात, गुलालाच्या मुक्त उधळणीत आणि जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत जल्लोषात केले जाणार आहे. रावगाव परिसरात वारकऱ्यांच्या नामघोषाने आणि भक्तिरसाने संपूर्ण वातावरण भारावून जाणार आहे.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी रावगाव ग्रामपंचायतीने सुमारे १५ हजार स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारला असून त्यामध्ये पाच ते सहा हजार वारकऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय १०० शॉवर स्नानगृह, ५५० शौचालये, मोबाईल चार्जिंग कक्ष, फूट मसाज कक्ष (३ मशीन), चप्पल दुरुस्ती कक्ष, कपडे इस्त्री कक्ष, दाढी व कटिंग कक्ष, हिरकणी कक्ष, दोन रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा कक्ष व आपत्कालीन सेवा कक्ष उभारण्यात आले आहेत. हिरकणी कक्षात अंगणवाडी सेविका, तर वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर व आरोग्य सेविका कार्यरत राहणार आहेत.


संत निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी पालखीचे शनिवार, दि. १८ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात रावगाव येथे आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वंकष नियोजन केले आहे. आषाढी वारीदरम्यान तालुक्यात विविध दिंड्यांचे आगमन व प्रस्थान होणार असल्याने दिंडी मार्गावरील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, स्वच्छता मोहीम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भोजन सुविधा, आरोग्य सेवा तसेच वाहतूक नियोजनावर विशेष भर देण्यात आला आहे. रावगाव, जेऊर आणि कंदर येथे पालखीचे मुक्काम होणार असून भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभाग समन्वयाने कार्यरत आहेत. जिल्ह्यात पालखीचे उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात स्वागत केले जाईल.

– शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा.


पालखी सोहळ्यासाठी पोलीस व विद्यार्थ्यांची संयुक्त सुरक्षा व्यवस्था

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा पोलीस प्रशासन आणि युनिव्हर्सल करिअर अकॅडमीचे विद्यार्थी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. रविवार, १९ जुलै रोजी पालखी करमाळा शहरातील सुभाष चौक येथे दर्शनासाठी थांबणार असून भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुभाष चौक ते झरे फाटा दरम्यान युनिव्हर्सल करिअर अकॅडमीचे विद्यार्थी पोलिसांना सहकार्य करणार असून, झरे फाटा ते तालुका हद्दीपर्यंत पोलीस प्रशासन व विविध अकॅडमीच्या स्वयंसेवकांकडून सुरक्षा व्यवस्था सांभाळली जाणार आहे.

– रणजित माने, पोलीस निरीक्षक, करमाळा पोलीस ठाणे.


रावगाव ग्रामपंचायतीकडून वारकऱ्यांसाठी आदर्श सुविधा

         संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे रावगाव येथे आगमन होत असताना, प्रशासकीय पातळीवर कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. १५,००० स्क्वेअर फुटांचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यापासून ते १०० शॉवरचे स्नानगृह व ५५० शौचालयांच्या स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक कामाचे सूक्ष्म नियोजन करमाळा महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महावितरण या सर्वांच्या समन्वयाने रावगाव ग्रामपंचायतीने केले आहे.

– श्री. नलवडे एच., ग्राम विकास अधिकारी (ग्रामसेवक), रावगाव ग्रामपंचायत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close