-->
करमाळाकृषी विषयक

मकाई साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन; यंदा ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष्य

 

करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामाची तयारी वेगाने सुरू असून, त्यानिमित्त कारखान्यात मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भिलारवाडी येथील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी लक्ष्मण अंबोधरे, कारखान्याच्या मार्गदर्शिका रश्मी (दिदी) दिगंबरराव बागल आणि चेअरमन दिनेश भांडवलकर यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला करमाळा तालुक्याच्या हरितक्रांतीचे प्रणेते व श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. दिगंबरराव (मामा) बागल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी संचालक मंडळातील उत्तम पांढरे, रामचंद्र हाके, अजित झांजुर्णे, संतोष पाटील, रेवन्नाथ निकत, दिनकर सरडे, सतीश नीळ, युवराज रोकडे, सचिन पिसाळ, नवनाथ बागल, गणेश झोळ, बापू चोरमले, हंसराज पाटील, विलास काटे, अनिल शिंदे, महेश तळेकर, राजेंद्र मोहोळकर, विष्णू माने, प्रभारी कार्यकारी संचालक एच. पी. खाटमोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे युद्धपातळीवर सुरू असून, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे करारही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती संचालक मंडळाने दिली. सर्व कामे वेळेत पूर्ण करून यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

यंदाच्या हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, तालुक्यातील सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील संपूर्ण ऊस श्री मकाई सहकारी साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close