
प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)


पंचायत समितीच्या सभापती पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य, दीन-दलित व उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, अशा सूचना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पंचायत समितीच्या नूतन सभापती सौ. पूजाताई ढेरे यांना दिल्या. पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सौ. पूजाताई ढेरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना जगताप म्हणाले की, “तुम्हाला अल्पवयात पंचायत समितीच्या सभापती पदाची संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवा. आपल्या कामाच्या माध्यमातून पुढील पिढीसमोर आदर्श निर्माण करणारे कार्य करा.”
तसेच त्यांनी पंचायत राज व्यवस्थेच्या इतिहासाचाही उल्लेख केला. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात पंचायत राज व्यवस्थेची स्थापना केल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान देशभक्त नामदेवराव जगताप यांना मिळाला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामाचा ठसा इतका प्रभावी होता की आजही त्यांच्या कार्याचा उल्लेख केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आवर्जून केला जातो. त्यांच्या कार्यातून जिल्हाभर कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभे राहिले होते, याचाही उल्लेख माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी यावेळी केला.



