
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


शिवसंस्कार प्रतिष्ठान, निमगाव (ह) यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही समाजप्रबोधनपर उपक्रम राबवत तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सलग १३ व्या वर्षी हा उपक्रम पार पडला असून विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मूर्ती पूजनाने झाली. यानंतर लहान मुलांसाठी शिवभक्तीवरील मनोगत स्पर्धा घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी जि.प. प्रा. शाळा निमगाव (ह) व जि.प. प्रा. शाळा निळवस्ती येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या सोयीसाठी कपाट व धान्य साठवण्यासाठी कोठारे देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
- या कार्यक्रमात आयोजित रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. उपस्थितांसाठी अल्पोपहार व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच संध्याकाळी जुगलबंदी भारुड या कार्यक्रमाने शिवजयंती उत्सवाची सांगता झाली. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे शिवसंस्कार प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.



