महाशिवरात्रीनिमित्त संगोबा येथे आदिनाथ महाराज यात्रेस आजपासून सुरुवात; यात्रा कमिटीकडून जय्यत तयारी

करमाळा l प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


संगोबा (ता. करमाळा) येथील आदिनाथ महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या पारंपरिक यात्रेसाठी यात्रा समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण असून भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच या वर्षी यात्रेमध्ये अंदाजे दीड ते दोन लाख भाविक दर्शन घेतील अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

मध्यरात्री १२ वाजल्यापासून मुख्य गाभाऱ्यात अभिषेकास सुरुवात झाली असून पहाटे ४ वाजता महाआरती होऊन त्यानंतर भाविकांना आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी दर्शन रांगेवर मंडप उभारण्यात आला आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी करमाळा बस स्थानकातून रविवार आणि सोमवार असे दोन दिवस २४ तास संगोबा यात्रा विशेष बस सोडण्यात येणार आहेत.
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वरकुटे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अन्नछत्र मंडळाच्या वतीने दिवसभर फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहन पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली असून मंदिराच्या उत्तरेकडील बाजूस दहा एकर जागेत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. सीना नदीपलीकडील गावांमधून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या पूर्वेकडे नदीपात्रात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली आहे. मुख्य यात्रा मंदिराच्या उत्तर बाजूस भरत असल्याने करमाळा मार्गावरील वाहतूक सुरळीत राहील, अशी माहिती यात्रा समितीने दिली. यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडावी यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा समितीकडून करण्यात आले आहे.




