
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील बोरगाव ते वाघाचीवाडी या ग्रामीण रस्त्यावरून सुरू असलेल्या ओव्हरलोड टिपरच्या बेफाम वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अतिवेगाने धावणाऱ्या आणि नियमबाह्य भार वाहून नेणाऱ्या टिपरमुळे शाळकरी मुले, महिला व ग्रामस्थांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचे बोरगाव, वाघाचीवाडी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, परांडा तालुक्यातील खडी क्रशर वाहतूक करणारी अवजड वाहने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात धावत असल्यामुळे या रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रहदारी करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. सततच्या जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला असून लहान मुलांना व वयस्करांना श्वसनचा त्रास होत आहे.
ओव्हरलोड टिपरची वाहतूक तात्काळ थांबवावी किंवा त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी संगोबा येथील पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात बोरगाव व वाघाचीवाडी येथील महिला व विद्यार्थी ही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय अधिकारी (माढा विभाग, कुर्डूवाडी), परिवहन अधिकारी अकलूज तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.



