-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

मांगी तलावातून २० % पाणी नेण्याचा घाट; लाभक्षेत्रातील शेतकरी आक्रमक

 

प्रतिनिधी l मांगी (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून हळगाव (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी विद्यालयासाठी सिंचन व पिण्याकरिता मांगी तलावातील पाणी आरक्षित करण्याच्या निर्णयावर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात मांगी तलाव संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला असून, येत्या काळात गावोगावी जनजागृती करून हजारो शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून गावोगावी बैठका घेण्यात येत असून दि. १४ जानेवारी रोजी वडगाव दक्षिण येथील महादेव मंदिर, दि. १५ जानेवारी रोजी मांगी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात तर दि. १६ जानेवारी रोजी वडगाव उत्तर येथिल हनुमान मंदिरात मांगी तलाव संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या. या बैठकीस सर्वपक्षीय ग्रामस्थ, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. राम शिंदे यांच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

 

मांगी तलावाची निर्मिती १९५० च्या दशकात करमाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी शेती व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी म्हणून करण्यात आली होती. या तलावामुळे मांगीसह पंचक्रोशीतील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आली असून, अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते. मात्र हा तलाव पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पर्जन्यमान चांगले असेल तरच तलाव भरतो; अन्यथा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

 

तलावाची साठवण क्षमता १ टीएमसी असली तरी सध्या २० टक्के गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात भरलेला तलाव दोन-तीन महिन्यांतच ४० टक्क्यांपर्यंत खाली येतो. त्यामुळे उन्हाळ्यात तलाव लाभक्षेत्रातील पुनवर, वडगाव उत्तर, वडगाव दक्षिण, मांगी, जातेगाव, हिवरवाडी, रावगाव, भोसे, राखवाडी, लिंबेवाडी, पोथरे, निलज, खांबेवाडी, धायखिंडी यांच्यासह वाड्या-वस्त्या तसेच बोरगाव सिंचन योजनेतील बारा गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

 

अनेक वर्षांपासून मांगी तलावाला कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. मात्र काही अपवाद वगळता गेल्या चार दशकांत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी ठोस पावले उचलली नाहीत. अशा परिस्थितीत पाणीटंचाईचा विचार न करता तलावातील पाणी आरक्षित करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला असून हा निर्णय मागे न घेतल्यास मांगी व तलाव लाभक्षेत्रातील हजारो शेतकरी व ग्रामस्थ आपल्या कुटुंबियांसह तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

 

या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, उपसरपंच नवनाथ बागल, पत्रकार प्रवीण अवचर, अभिजीत वाघमोडे, विकास गायकवाड, उमेश बागल, अभिमान अवचर, संतोष नरसाळे, सुधाकर नरसाळे, राहुल जाधव, किरण बागल, बापू वाडेकर, दिवाण बागल, निळकंठ बागल, प्रताप बागल, महादेव अवचर, दिगंबर बागल, बाळासाहेब नलावडे, राजाभाऊ क्षीरसागर, मेजर चंद्रकांत बागल, अनिल बागल, निखिल बागल, संभाजीराजे बागल यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

 

तलावातील पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन

करमाळा तालुक्यातील दुष्काळी गावांसाठी वरदान ठरलेला मांगी तलाव दरवर्षी उन्हाळ्यात कोरडा पडतो. सध्याच्या स्थितीत गाळामुळे पाणी लवकर संपते. अशा परिस्थितीत सक्तीचा जीआर काढून तलावातील पाणी नेण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

– सुजित बागल, ग्रामपंचायत सदस्य, मांगी


“निर्णायक मतदान देऊनही आम्हाला अंधारात ठेवले”

पाण्यासारख्या जीवनावश्यक विषयावर लोकप्रतिनिधींनी राजकारण करणे ही प्रामाणिक मतदारांची मोठी निराशा आहे. मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थांनी ज्यांना निर्णायक मतदान केले, त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता अशा अन्यायकारक जीआरला संमती कशी दिली, हा गंभीर प्रश्न आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आमदारांनी याचा जाहीर खुलासा करावा, अशी आमची ठाम मागणी आहे.

– श्री. अभिजीत वाघमोडे, पांडुरंग पाणी वापर संस्था, बिटरगाव (श्री)


करमाळ्यातील नेते गप्प, शेजारील तालुके पाणी नेत आहेत

मांगी तलाव पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कुकडी किंवा उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी करमाळा तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी ठोस निर्णय घेत नाही. मात्र याच मांगी तलावातून शेजारील तालुक्यांतील नेते बिनधास्तपणे पाणी नेण्यासाठी जीआर काढून घेतात व त्यासाठी निधीही मंजूर करून घेतात. एवढी प्रक्रिया होत असताना करमाळा तालुक्यातील नेते गप्प बसले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

– श्री. किरण बागल, शेतकरी, मांगी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close