प्रगती विद्यालय, मांगी येथे आनंद मेळावा उत्साहात; विद्यार्थ्यांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मांगी | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच मांगी गावचे सुपुत्र युवा नेते दिग्विजय दिगंबर बागल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोमवार दि. १२ जानेवारी रोजी मांगी (ता. करमाळा) येथील प्रगती विद्यालयात आनंद मेळा बाजार उत्साहात भरविण्यात आला. या आनंद मेळाव्यास पालक व ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद लाभला. मेळाव्याचे उद्घाटन शीला प्रवीण अवचर व नूतन बागल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रगती विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावे या उद्देशाने विविध खाऊचे व बाजाराचे स्टॉल या मेळाव्यात लावण्यात आले होते. तसेच महिलांचा आवडता सण असलेल्या मकर संक्रांतीसाठी लागणारे वाणाचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने मांगी गावातील महिलांची मोठी गर्दी बाजारात पाहायला मिळाली.
या उपक्रमासाठी प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुपमा देवकर मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी मांगी येथील ग्रामस्थ सुनील बागल, अशोक गवळी, स्वप्निल पाटील, पप्पू देशमाने आदींसह अनेक नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. एकूणच शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा संगम असलेला हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.




