
करमाळा | प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा पवार गट) वतीने करमाळा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. आज सोमवार दि. १२ जानेवारी रोजी नालबंद मंगल कार्यालय येथे झालेल्या या मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने जोरदार शक्तीप्रदर्शन करत ‘युती-आघाडी नको, संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावरच निवडणूक लढवावी’ असा एकमुखी नारा दिला.
या मेळाव्यात ॲड. अजित विघ्ने, ॲड. नितीन राजेभोसले, अण्णासाहेब पवार, सुजित तात्या बागल, रोहिदास सातव, दत्तात्रय अडसूळ, दादासाहेब जाधव, विनय ननवरे, रवींद्र वळेकर आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. कुर्डूवाडी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशाचा दाखला देत, मतदारांच्या विश्वासाच्या बळावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही यश मिळणारच, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सुभाष आबा गुळवे, तात्यासाहेब मस्कर, चंद्रकांत सरडे, राजेंद्रकुमार बारकुंड, नवनाथ भांगे, ॲड. गिरंजे, विलास दादा पाटील, तानाजी झोळ, विलास राऊत, अशोक पाटील, विवेक येवले, पोपट सरडे, निळकंठ अभंग, तात्यासाहेब जाधव, चंद्रहास निमगिरे, सुहास रोकडे, नानासाहेब निळ, उद्धव दादा माळी, सुजित बागल, नानासाहेब लोकरे, नानासाहेब मोरे, प्रकाश थोरात, तात्यामामा सरडे, राजेंद्र धांडे, डॉ. गोरख गुळवे, राजेंद्र बाबर, आर.आर. बापू साखरे, अभिजीत पाटील, शंकर जाधव, सुदाम शेळके, सुहास आबा साळुंखे, राजाभाऊ देशमुख, सोमनाथ रोकडे, संदीप तळेकर, बाळासाहेब ढेरे, मयूर पाटील, गौरव झांजुर्णे, गणेश गुंडगिरे, बाळासाहेब पाटील, उमेश इंगळे, महेश गंणगे, अनिल शेजाळ, अशोक तकिक, प्रमोद बदे, विकास गोंदकर, युवराज गपाट, राहुल कुकडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांची लायकी काय?’ –मा.आ. संजयमामा शिंदे
ज्यांचे स्वतःचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, जे खंडणी व हप्ते मिळत नाहीत म्हणून तहसीलदारांवर हक्कभंग आणतात, कंत्राटदार टक्केवारी देत नाही म्हणून दहिगाव उपसा सिंचनचे पाईप जाळून कामे बंद पाडतात, असे लोक आज माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. अशा लोकांची माझ्यावर टीका करण्याची लायकीच नाही, अशी घणाघाती टीका संजयमामा शिंदे यांनी केली. मी जाती-नात्यांचे नव्हे तर विकासाचे राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. दोन निवडणुकांतील पराभवानंतरही माझा एकही कार्यकर्ता सोडून गेलेला नाही, हेच माझे खरे नैतिक बळ आहे. आदिनाथ कारखाना निवडणुकीत १२ पैकी ५ गणांमध्ये आपल्याला आघाडी मिळाली असून सुमारे ४५ टक्के मतदान सभासदांनी दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता निश्चितच आपल्याला कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘कारखाना चालवण्याची ताकद नारायण पाटलांकडे नाही’ – सुभाष (आबा) गुळवे
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी नारायण पाटील यांच्यावर टीका करताना सांगितले की, कारखाना सुरू ठेवण्याची व वाचवण्याची ताकद आणि पात्रता त्यांच्याकडे नाही. सभासदांनी मोठ्या विश्वासाने सत्ता दिली असतानाही आमदार व चेअरमन यांचा स्वतःचा ऊस पवारांच्या कारखान्याला जात आहे. कारखान्यातून सोन्याचा धूर निघेल अशी स्वप्ने दाखवली गेली; मात्र प्रत्यक्षात शेतकरी सभासदांच्या स्वप्नांची राखरांगोळी होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर हा कारखाना निलावात निघणार आहे. त्यामुळे यापूर्वीची चूक पुन्हा न करता संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.




