
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार, दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वा. विद्यानगर, करमाळा येथे संपन्न होणार आहेत, अशी माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका रश्मीदिदी बागल यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी झाल्यानंतर सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारी दुपारी १ वाजता करमाळा (विद्यानगर) येथे घेण्यात येणार आहेत, तर सकाळी ११ वाजता कुर्डुवाडी येथेही अशाच प्रकारच्या मुलाखती पार पडतील.
या मुलाखतीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिनजी कल्याणशेट्टी तसेच भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंहजी केदार हे प्रमुख उपस्थित राहणार असून इच्छुकांनी वेळेवर मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. तसेच महिला इच्छुक उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहावे, प्रतिनिधीमार्फत उपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.
करमाळा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उतरून लढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम आणि स्वच्छ भारताच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करमाळा नगरपरिषद निवडणुकीत सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने व जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच घवघवीत यश मिळणार आहे. निश्चितच घवघवीत यश संपादन करू.
रश्मीदिदी बागल, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा.



