-->
करमाळादेशराज्यविशेष

कोंढेजच्या सुपुत्राचा पराक्रम! एपीआय शिवाजी ननवरे यांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२५’ मध्ये नोंद

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील कोंढेज या छोट्याशा गावातील सुपुत्र आणि सध्या नागपूर शहर पोलिस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी हिमालयातील चार सर्वोच्च शिखरे सर करून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय पर्वतारोहण पराक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२५’ मध्ये करण्यात आली आहे.

 

एपीआय ननवरे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४८.८६ मीटर) सोबतच मकालू (८४८५ मी.), मनासलू (८१६३ मी.) आणि लोहसे (८५१६ मी.) ही चारही ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीची शिखरे यशस्वीरीत्या सर केली आहेत. ही दुर्मीळ आणि धाडसी मोहीम पार करणारे ते देशातील एकमेव पोलीस अधिकारी आहेत.

 

त्यांच्या या कामगिरीबद्दल नागपूर शहर पोलिस आयुक्त मा. रवींद्र कुमार सिंगल (भा.पो.से.), सह आयुक्त मा. नवीन चंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त मा. रवींद्र सिंग परदेशी, पोलीस उपायुक्त मा. राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील, तसेच सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

 

या कामगिरीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी दूरध्वनीद्वारे एपीआय ननवरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या पराक्रमामुळे महाराष्ट्र पोलिस दलासह नागपूर पोलिसांचे नाव भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close