-->
करमाळाविशेष

करमाळा तहसीलसमोर स्वातंत्र्यदिना दिवशीच ‘या’ संस्थेच्या विरोधात कृ.ऊ.बा.स. संचालक रोडगे यांचे आमरण उपोषण

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व हमाल पंचायतीचे सचिव वालचंद रोडगे यांचे महात्मा फुले समता नागरी सहकारी संस्था मर्यादित करमाळा या संस्थेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू

 

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व हमाल पंचायत चे सचिव श्री. वालचंद विठोबा रोडगे यांना महात्मा फुले समता नागरी सह. पतसंस्था मर्यादित, करमाळा यांनी सन २०१८ ची मुदत ठेव अद्यापही परत केली नसल्याने संबंधित अधिकारी, कर्मचारी व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा माझी रक्कम मला व्याजासहित परत मिळावी या मागणीसाठी दिनांक १५ आॅगस्ट रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशीच सकाळी ९:३० वाजता करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असल्याची माहिती रोडगे यांनी दिली.

 

याबाबत अधिक माहिती सांगताना रोडगे म्हणाले की, मी करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये हमालीचे काम करीत असतो. माझा व माझ्या कुटुंबांचा उदरनिर्वाह हा हमाली व शेतीवरच अवलंबून आहे. मी माझ्या कष्टातून व प्रपंच्यामधील पैशाची बचत करून ३०,०००/- रुपये जमा केले होते. त्या पैशाची महात्मा फुले समता ना. सह. पत. मर्या. करमाळा यांच्याकडे सभासद असल्याने मुदत ठेव पावती सन २०१३ साली केली. रक्कम रु.३०,०००/- च्या मुदत ठेव पावतीची सन २०१६ ला मुदत संपली. त्यावेळी व्याजा सहित रक्कम रु.४५,५००/- झाले आणि त्यानंतर रक्कम रु.४५,५००/- ची परत मुदत ठेव पावती दि.२७/०७/२०१६ रोजी १२ महिन्यासाठी केली. त्या पावतीचीही मुदती दिनांक २७/०८/२०१७ ला संपली असून त्याची रक्कम रु. ५१,१५०/- झाले आहेत. तसेच त्या रकमेची मुदत ठेव पावती दि. ३०/०८/२०१७ रोजी केली आहे. त्याची मुदत दि. ०५/०५/२०१८ रोजी संपली आहे. तरी मुदत संपल्यानंतर मी बरेच दिवस संस्थेचे चेअरमन, मॅनेजर, संचालक मंडळ, सचिव यांच्याकडे जात होतो. तेव्हा ते फक्त गोड बोलून वेळ मारत होते. नंतर त्यांना पैसे मागितल्यावर काहीतरी कारण सांगून टाळाटाळ करू लागले. यानंतर मलाच दम देऊ लागले की, पैसे मागितले तर याद राख, तुला करमाळ्याला येऊ देणार नाही, तुला पैसे मिळणार नाही, तुला काय करायचे आहे ते कर, अशा प्रकारे दमदाटी करून पैसे देणेस टाळाटाळ करीत आहेत. वास्तविक संबंधित संस्थेचे चेअरमन, मॅनेजर, संचालक मंडळ, सचिव यांनी माझे मुदत ठेव रक्कम बुडविण्याचे उद्देशाने सदरील माझे मुदत ठेव पावतीची रक्कम मला देत नाहीत. सध्या माझ्यावर आर्थिक अडचणीचे संकट आहे. त्यामुळे मला सदर रकमेची नितांत गरज आहे. तरी दि. ०५/०५/२०१८ पासूनचे माझे व्याजासहित सर्व रक्कम मला लवकरात लवकर मिळावी किंवा वरील पतसंस्थेचे चेअरमन, मॅनेजर, संचालक मंडळ, सचिव यांचेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवणार आहे. मग त्यापुढील होणाऱ्या सर्व परिणामांस उपरोक्त लोक सर्वस्वी जबाबदार राहतील याची आपण नोंद घ्यावी.

 

याबाबत रोडगे यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर, पोलीस अधिक्षक सोलापुर, उपविभागीय अधिकारी सो. माढा विभाग कुर्डवाडी, मा. तहसीलदार साहेब करमाळा, पोलीस निरीक्षक करमाळा, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा यांना उपोषणाचे निवेदन दिले आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close