माय मराठी न्युज नेटवर्क


जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यामधील सावखेडा बुद्रुक या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे सतीश परदेशी आणि गायत्री परदेशी हे दाम्पत्य राहात होते. त्यांना दोन अपत्ये असून एक सहा वर्षाचा मुलगा आणि एक चार वर्षाची मुलगी आहे. गुरुवारी रात्री घरातील सर्व मंडळी झोपलेली असताना त्याने झोपेत असलेल्या आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला आणि घराबाहेर येऊन आरडाओरड करू लागला. त्याला आरडाओरड करताना बघून शेजारीच राहणाऱ्या त्याचा लहान भावाने त्याला अडविले आणि तू का आरडाओरड करत आहे? आणि रात्रीच्या वेळी कुठे जात आहे? असे विचारता त्याने मी माझ्या बायकोला ठार मारले आहे असे सांगितले. त्यावेळी त्याचा भाऊ संदीप याने घरामध्ये जाऊन पाहिले असता त्याला गायत्रीचा मृतदेह दिसला आणि दोन्ही मुले झोपलेल्या अवस्थेत दिसली.
याबाबात सविस्तर वृत्त असे की, सतीश आणि संदीप यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी सतीश आणि त्याचे कुटुंब नाशिकला जाणार होते. त्यासाठी ते त्यादिवशी लवकर झोपले होते. सतीशने पत्नी गायत्री हिचा गळा आवळून खून केला व नंतर गावातील माजी सरपंचाच्या शेतात जाऊन पळसाच्या झाडावर चढून स्वतःच्या अंगातील घातलेले स्वेटर आणि पँट चे दोन तुकडे करत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा शोध कुटुंबातील सदस्य घेत असता त्यांना हा शेतातील पळसाच्या झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मयत पत्नी आणि सतीश चे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.
पिंपळगाव पोलिसांनी आत्महत्या आणि खुनाचा गुन्हा म्हणून घटनेची नोंद केली आहे. सतीशच्या मानसिक अवस्थेत बिघाड असल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.




