करमाळा प्रतिनिधी


शोषितांचे, दिन दलितांचे, गोरगरिबांचे, मजुरांचे प्रश्न आपल्या साहित्यातून मांडून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचले तर निश्चितच आपली पत्रकारिता मजबूत होईल. असे प्रतिपादन करमाळा तालुका पत्रकार संघ कार्यालय, पत्रकार कट्टा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतीथीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी व्यक्त केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले या पुण्यतिथीचे निमित्त साधून करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करमाळा शहरात धुणी-भांडी, शिवणकाम असे काम करून आपल्या प्रपंचाचा गाडा स्वाभिमानाने चालवणाऱ्या १५ महिलांना एक महिना पुरेल असा किराणामाल मदत म्हणून देण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे सचिव नासीर कबीर, प्राध्यापक अशोकराव नरसाळे, संघर्ष न्यूज चैनलचे संचालक सिद्धार्थ वाघमारे, माणदेश नगरी चे पत्रकार नागेश शेंडगे, शिवनिर्णय तालुका प्रतिनिधी अविनाश जोशी, दैनिक कटूसत्त चे निलेश चव्हाण, मुक्ताई गारमेंट चे मॅनेजर प्रदीप बनसोडे, स्पार्क शर्ट कारखान्याचे व्यवस्थापक केशव साळुंके, हिवरवाडी चे माजी सरपंच राजेंद्र मिरगळ, शेलगाव चे प्रगतशील शेतकरी भीमराव बनसोडे आदीजण उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी पत्रकारांना नासीर कबीर यांनी माहिती दिली. या कार्यक्रमात मिळालेल्या एक महिन्याचा किराणा सामान मुळे कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.



