-->
करमाळासामाजिक

‘आपले केम स्वच्छ केम’ अभियानाला अधिकाऱ्यांची दाद; स्वच्छतेची चळवळ तालुका-जिल्हाभर नेण्याचा संकल्प

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील केम गावातील युवकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘आपले केम स्वच्छ केम’ ग्रामस्वच्छता अभियानाला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाची दखल घेत करमाळा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी युवकांचे कौतुक केले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी स्वतः युवकांसोबत श्रमदान करून स्वच्छतेचा संदेश दिला.

या स्वच्छता मोहिमेत करमाळ्याचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत तसेच छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी यांच्यासह मान्यवरांनी सहभाग घेतला.
दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. केममधील युवकांनी सुरू केलेल्या या स्वच्छता चळवळीची प्रेरणा घेऊन पुढील आठ दिवसांत दक्षिण सोलापूर तालुक्यातही स्वच्छता अभियान सुरू करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शासन ग्रुपचे सहकारी उपाध्यक्ष दादासाहेब तनपुरे यांनीही श्रमदानात सहभाग घेत युवकांचे कौतुक केले. प्रत्येक युवकाने गावाच्या स्वच्छतेसाठी पुढे आले पाहिजे. ही चळवळ गावातून तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गड-किल्ले स्वच्छता मोहिमेतूनही स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी वैभव तळेकर यांचेही या अभियानाला सातत्याने सहकार्य मिळत आहे. स्वच्छता मोहिमेसाठी आवश्यक प्रशासकीय मदत करण्याबरोबरच दर रविवारी दोन तास गावासाठी श्रमदान करण्याची ग्वाही त्यांनी दिली. केम गावातील युवक दर रविवारी एकत्र येऊन गावातील विविध ठिकाणी स्वच्छता करत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागृती निर्माण होत आहे. ‘स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सहभाग’ हा संदेश या अभियानातून दिला जात आहे.


केममधील युवकांनी स्वतःहून स्वच्छतेची जबाबदारी घेतल्याबद्दल त्यांचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो. ही चळवळ केवळ केमपुरती न ठेवता संपूर्ण करमाळा तालुक्यात राबविण्याची गरज असून या अभियानासाठी प्रशासनाकडून कोणत्याही सहकार्याची गरज भासल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा, त्यांना आवश्यक ते सहकार्य सर्व सहकार्य करण्यात येईल.
– डॉ. अमित कदम, गटविकास अधिकारी, पं. स. करमाळा.


आठ आठवड्यांपासून युवकांचे श्रमदान

केम गावात गेल्या आठ आठवड्यांपासून युवकांच्या पुढाकारातून दर रविवारी दोन तास श्रमदान करून ग्रामस्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत उत्तरेश्वर मंदिर परिसर, बाजारतळ, नागोबा गल्ली, महात्मा गांधी चौक आणि पालखी मार्गाची स्वच्छता करण्यात आली. आतापर्यंत या परिसरातून १५ पेक्षा अधिक कचरा गाड्या कचरा गोळा करण्यात आला आहे. गाव स्वच्छ ठेवण्यासाठी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असून, पुढील काळातही ही स्वच्छता मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

– संदीप तळेकर, ग्रामस्थ, केम

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close